हरारे : भारत वि. झिम्बाब्वे तिसऱ्या टी २० सामन्यात भारताने आपल्या विजयाची लय कायम राखत तिसऱ्या टी २० सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर भारताने १८२ धावांचा डोंगर रचला होता. झिम्बाब्वेचा संघ १८३ धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरला खरा, पण सुरुवातीपासूनच त्यांना भारताच्या गोलंदाजांनी धक्के दिले आणि त्यामुळेच त्यांना पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर २३ धावांनी दमदार विजय साकारला. या विजयासह भारताने टी २० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. डिऑन मेअर्सने यावेळी अर्धशतक झळकावले खरे, पण तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर हा सामनावीर ठरला.
शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारताला ताबडतोड सुरुवात करून दिली. यशस्वीने पहिल्यापासूनच आक्रमक पवित्रा धारण केला. यशस्वी आपली विकेट गमावून बसला. यशस्वीने यावेळी २७ चेंडूंत ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३६ धावा केल्या. यशस्वी बाद झाल्या फलंदाजीला आलेला अभिषेक शर्मा १० धावाच करू शकला. पण त्यानंतर शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांची चांगलीच जोडी जमली.
भारताच्या १८३ धावांचा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वेला भारताने चार षटकांत तीन धक्के दिले. त्यामुळे झिम्बाब्वेची ३ बाद १९ अशी दयनीय अवस्था आली होती. त्यानंतर भारताने अजून दोन विकेट्स मिळवल्या आणि झिम्बाब्वेची ५ बाद ३९ अशी अवस्था केली. पण त्यानंतर डिऑन मेअर्स आणि क्लाइव्ह मडाने यांनी धडाकेबाज फटकेबाजी केली खरी, पण त्यांना झिम्बाब्वेला विजय मिळवून देता आला नाही.