Monday, March 10, 2025 06:00:06 AM

India Won Champions Trophy २०२५ : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली! टी-२० नंतर वनडेतही टीम इंडियाच किंग!

भारताने ICC Champions Trophy २०२५ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव करून तिसऱ्यांदा हे प्रतिष्ठित जेतेपद आपल्या नावे केले आहे.

india won champions trophy २०२५  भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली टी-२० नंतर वनडेतही टीम इंडियाच किंग
India Won Champions Trophy २०२५ : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली! टी-२० नंतर वनडेतही टीम इंडियाच किंग!

भारतीय संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ICC Champions Trophy २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव करत तिसऱ्यांदा हा किताब पटकावला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता विजेतेपदावर आपले नाव कोरलं. भारतानं तब्बल १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ICC Champions Trophy चे विजेतेपद पटकावले.

भारतीय संघाच्या विजयाचे प्रमुख शिल्पकार कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय गोलंदाज ठरले. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २५१ धावांचे लक्ष्य दिले होते. पण भारतीय संघाने या आव्हानाचा सामना यशस्वीरित्या केला. रोहित शर्माने आक्रमक खेळी करत ८३ चेंडूत ७६ धावा केल्या. तर श्रेयस अय्यर (४८) आणि के.एल. राहुल (नाबाद ३४) यांनी जबाबदारीने खेळ करत संघाला विजय मिळवून दिला. सामन्याच्या अखेरच्या षटकात रवींद्र जडेजाने विजयी चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

न्यूझीलंडच्या फलंदाजांचे कडवे आव्हान

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवात धडाकेबाज झाली. रचिन रवींद्र (३७) आणि विल यंग (४२) यांनी चांगली भागीदारी केली. वरूणने यंगला पायचित करत ही जोडी फोडली. त्यानंतर कुलदीपने धोकादायक राचिनच्या दांडा उडवल्या. त्यानंतर केन विल्यमसन देखील स्वस्तात बाद झाला. तेव्हा डॅरिल मिचेल (६३) आणि मायकेल ब्रेसवेल (५३) यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत संघाला २५१ धावांपर्यंत पोहोचवले. भारताच्या फिरकीपटूंनी टिच्चून मारा करत न्यूझीलंडच्या धावसंख्येला आळा घातला. कुलदीप यादव आणि वरूण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि जडेजाने १-१ गडी बाद केला.

हेही वाचा - जसप्रीत बुमराह IPL 2025 मध्ये खेळणार की नाही? मोठा खुलासा!

रोहित-गिलची शतकी भागीदारी आणि राहुलचा संयमी खेळ

भारताने लक्ष्याचा पाठलाग दमदार सुरुवात करत केला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. गिल ३१ धावा करून बाद झाल्यानंतर विराट कोहली स्वस्तात माघारी परतला. तेव्हा श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी मधल्या फळीत चांगला खेळ करत भारताचा पाया भक्कम केला. अय्यरने ४८ तर अक्षरने २९ धावा केल्या. शेवटच्या टप्प्यात के.एल. राहुल आणि हार्दिक पांड्या (१८) यांनी संयमी फलंदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले आणि राहुल जडेजा जोडीने भारताच्या विजया शिक्कामोर्तब केले.

हेही वाचा - Vinesh Phogat: विनेश फोगाटच्या घरी लवकरच येणार नवा पाहुणा, सोशल मीडियावर दिली 'गुड न्यूज'

१२ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी भारताच्या ताब्यात

२०१७ मध्ये पाकिस्तानकडून झालेल्या अंतिम फेरीतील पराभवानंतर भारतीय संघाला ही ट्रॉफी जिंकण्यासाठी तब्बल १२ वर्षे वाट पाहावी लागली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अजेय राहून अंतिम सामन्यात विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा एकदा आपल्या नावे केली. यासह भारताने गेल्या १० महिन्यांत दुसरी आयसीसी स्पर्धा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे.


सम्बन्धित सामग्री