मुंबई: भारत आणि इंग्लंड संघामधील तिसरा टी 20 सामना राजकोटच्या निरंजन शाह क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. पाहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाचे वर्चस्व राहिले. भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज हतबल दिसले. भारताचं लक्ष्य हा सामना जिंकून मालिका जिंकणं असेल.
इंग्लंडचे मध्यक्रमातील फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. लिअम लिविंगस्टन आणि हॅरी ब्रूक हे त्यांचा फलंदाजीने प्रभाव टाकू शकलेले नाहीत. कर्णधार जोस बटलरला वगळता कोणताच फलंदाज भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकू शकलेला नाही. ब्रेडन कार्सने चेन्नईतील सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमधून चांगलं योगदान दिलेलं पण संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.
भारतीय संघाचा विचार केला तर मोहम्मद शमीला गोलंदाजी करताना बघायची ईच्छा सर्व भारतीय चाहत्यांना आहे. शमीने शेवटचा टी 20 सामना 2022 मध्ये इंग्लंडविरुद्दच खेळला होता. भारतीय गोलंदाज वरूण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि अर्षदिप सिंग यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. फलंदाजांमध्ये अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी चांगली फलंदाजी केली आहे. पण, संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवकडून मोठ्या खेळीची अपेक्षा राहील. भारतीय संघात काही बदल होतील का ? हे देखील बघण्यायोग्य असेल.
हा सामना 7 वाजता सुरु होणार आहे. राजकोटची खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम मानली जाते. महिन्याच्या सुरवातीस भारतीय महिला संघ विरुद्ध आयर्लंड महिला संघ हा सामना या मैदानात झाला होता. या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 435 धावा केल्या होत्या.