सामन्याच्या सुरवातीस भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे 4 खेळाडू 78 धावांवर बाद केले. अरुंधती रेड्डीने भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलिया संघाला खराब स्थितीत आणून सोडले. मात्र, अनाबेल सदरलँड आणि ऍशली गार्डनर यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला. गार्डनर आणि सदरलँड यांच्यामध्ये 107 चेंडूत 96 धावांची भागीदारी झाली. गार्डनर 50 च्या धावसंख्येवर बाद झाली. पण, अनाबेल सदरलँडने एका बाजूने डाव धरून ठेवला. तिने 110 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलिया संघाला 296 धावांवर पोहचवलं. तालिहा मॅग्रा आणि सदरलँड या खेळाडूंमध्ये 122 धावांची भागीदारी झाली. जेमिमा रॉड्रीग्जने अनाबेल सदरलँडला 110 धावांवर धावबाद केलं. भारताकडून अरुंधती रेड्डीने 4 बळी घेतले तर दीप्ती शर्माने 1 बळी घेतला.
भारतासमोर 297 धावांचं लक्ष्य होतं. 16 धावांवर भारताने रिचा घोषची 'विकेट' गमावली. मात्र, त्यानंतर स्मृती मंधानाने भारताचा डाव सावरला. भारत विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता असं वाटत होतं. मात्र, हरलीन देओलच्या 'विकेट' नंतर भारताचा डाव पत्त्यांच्या महालासारखा कोसळला. हरलीन 39च्या धावसंख्येवर बाद झाली. स्मृती मंधानाने आपलं शतक पूर्ण केलं आणि त्यानंतर ती बाद झाली. मंधाना आणि हरलीन देओल यांना सोडता कोणतेच भारतीय फलंदाज 20 धावा देखील करू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून ऍशली गार्डनरने 5 बळी घेतले. मेगन शट आणि अलाना किंग यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले तर अनाबेल सदरलँडने 1 बळी घेतला.
अनाबेल सदरलँडला सामनावीर आणि मालिकावीर म्हणून घोषित केलं गेलं. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने पराभवानंतर खंत व्यक्त केली.