Saturday, September 28, 2024 02:01:42 PM

डी. गुकेश जगज्जेतेपदासाठी लढणार

डी गुकेश जगज्जेतेपदासाठी लढणार

नवी दिल्ली, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भारताचा युवा ग्रॅंड मास्टर डी. गुकेशने फिडे कॅंडिडेट्स स्पर्धा जिंकली. आता त्याला बुद्धिबळाच्या जगज्जेतेपदासाठी लढण्याची संधी आहे. याआधी भारताकडून विश्वनाथन आनंदलाच बुद्धिबळाचे जगज्जेतेपद मिळवता आले होते. जगज्जेतेपदाची लढत कुठे होईल, हे जाहीर व्हायचे आहे. पण या लढतीत गुकेश सध्या जगज्जेता असलेल्या डिंग लिरेन विरुद्ध खेळेल. या निमित्ताने बुद्धिबळाच्या विश्वविजेजेतेपदासाठी भारत विरुद्ध चीन अशी लढाई रंगेल.

यंदा कॅनडाच्या टोरांटोमध्ये ३ ते २२ एप्रिलदरम्यान कॅंडिडेड्स स्पर्धा झाली. जगभरातील आघाडीच्या बुद्धिबळपटूंमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. स्पर्धेच्या विजेत्याला जगज्जेतेपदाच्या लढतीत विद्यमान विजेत्याशी लढण्याची संधी मिळते.

कॅनडात झालेल्या कॅंडिडेड्स स्पर्धेत आठ जागतिक दर्जाचे युवा बुद्धिबळपटू सहभागी झाले. यात भारतातील यात डी. गुकेश, विदित गुजराती आणि प्रज्ञानंद हे तीन बुद्धिबळपटू होते. स्पर्धा जिंकणारा गुकेश १७ वर्षांचा आहे. तो ही स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला आहे. स्पर्धेच्या अखेरच्या फेरीत गुकेश आणि अमेरिकेचा हिकारु नाकामुरा यांचा सामना बरोबरीत सुटला. अमेरिकेचा कारुआना आणि रशियाचा नेपोम्नियाची यांच्यातला डावही बरोबरीत सुटला आणि आधीच्या कामगिरीमुळे गुकेशच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

गुकेश दहा वर्षांचा असल्यापासून बुद्धिबळ खेळत आहे. त्याचे वडील रजनीकांत डॉक्टर आहेत. ते कान, नाक, घसा तज्ज्ञ आहेत. गुकेशची आई पद्माकुमारी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. ती मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये शिकवते. गुकेशचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशातले आहे.

        

सम्बन्धित सामग्री