Tuesday, July 02, 2024 09:03:04 AM

भारताचा 'ब्रायन लारा' प्रखर चतुर्वेदी

भारताचा ब्रायन लारा प्रखर चतुर्वेदी

नवी दिल्ली, १६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : एखादा क्रिकेटपटू जेव्हा चारशे किंवा त्यापेक्षा जास्त धावा करतो तेव्हा सर्वात आधी आठवण येते ती वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारा या दिग्गज फलंदाजाची. आता लारासोबतच एका भारतीयाचं नाव पण चर्चेत असेल. हा भारतीय आहे प्रखर चतुर्वेदी. कूचबिहार क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकच्या प्रखर चतुर्वेदीने कमाल केली. त्याने अंतिम सामन्यात मुंबईविरुद्ध ४०४ धावांची खेळी केली. कूचबिहार क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चारशेपेक्षा जास्त धावा करणारा सलामीवीर फलंदाज अशी प्रखर चतुर्वेदीच्या कामगिरीची ऐतिहासिक नोंद झाली. त्याने ६३८ चेंडू खेळून नाबाद ४०४ धावा केल्या. यात तीन षटकार आणि ४६ चौकारांचा समावेश होता.

https://twitter.com/BCCIdomestic/status/1746824381333230057

कर्नाटकने आठ बाद ८९० धावा करून डाव घोषित केला. प्रखरची ४०४ धावांची खेळी ही कूचबिहार क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाची मोठी खेळी आहे. याआधी विजय जोलने कूचबिहार क्रिकेट स्पर्धेत ४५१ धावांची खेळी केली होती. प्रखरचे वडील हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि आई डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ आहे.

प्रखर चतुर्वेदी हा भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडचा साथीदार आहे. दोघे कर्नाटकसाठी क्रिकेट खेळतात. प्रखर आणि समित दोघेही कूचबिहार क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या विरोधात खेळत आहेत. समित द्रविड या सामन्यात २२ धावा करून बाद झाला.

     

सम्बन्धित सामग्री