Tuesday, July 02, 2024 08:57:10 AM

भारताचा दणदणीत विजय

भारताचा दणदणीत विजय

अहमदाबाद, १४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धचा सामना भारताने सात गडी राखून जिंकला. या विजयासह भारताने यंदाच्या विश्वचषकातील सलग तीन साखळी सामने जिंकले. गुण तालिकेत भारत पहिल्या स्थानावर पोहोचला.

याआधी नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. पाकिस्तानचा डाव ४२.५ षटकांत १९१ धावांत आटोपला. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने ३०.३ षटकांत ३ बाद १९२ धावा केल्या.

भारताची फटकेबाजी

भारताकडून रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, विराट कोहली आणि केएल राहुल यांनी तुफान फटकेबाजी केली. रोहित शर्माने ६३ चेंडूत ८६ धावा केल्या. रोहितने सहा षटकार आणि सहा चौकार मारत ही कामगिरी केली. तर श्रेयस अय्यरने ६२ चेंडूत नाबाद ५३ धावा करताना दोन षटकार आणि तीन चौकार मारले. शुभमन गिलने ११ चेंड़ूत चार चौकार मारत १६ धावा केल्या. विराट कोहलीने १८ चेंडूत ३ चौकार मारत १६ धावा केल्या. केएल राहुलने २९ चेंडूत नाबाद १९ धावा करताना दोन चौकार मारले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने शुभमन गिल आणि रोहित शर्माला बाद केले. तर हसन अलीने विराट कोहलीला बाद केले.

आझम, रिझवान बाद होताच पाकिस्तानचा डाव गडगडला

बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान बाद होताच पाकिस्तानचा डाव गडगडला. पाकिस्तानने ४२.५ षटकांत सर्वबाद १९१ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

पाकिस्तानच्या कोणत्या फलंदाजाने केल्या किती धावा ?

बाबर आझम ५०, मोहम्मद रिझवान ४९, इमाम - उल - हक ३६, अब्दुल्ला शफीक २०, हसन अली १२, सौद शकील ६, इफ्तिखार अहमद ४, मोहम्मद नवाज ४, शादाब खान २, हारिस रौफ २. शाहीन आफ्रिदी नाबाद २ धावा.

महत्त्वाचे

यंदाच्या विश्वचषकात भारताने सलग तीन साखळी सामने जिंकले
भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा पराभव केला
भारताने पाकिस्तानला आतापर्यंत आठ वेळा विश्वचषकात हरवले
पाकिस्तान शनिवारच्या सामन्यात सर्वबाद १९१ धावा करू शकला. ही पाकिस्तानची विश्वचषकातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या
पाकिस्तानने १९९९ च्या विश्वचषकात सर्वबाद १८० धावा केल्या होत्या. ही पाकिस्तानची विश्वचषकातील सर्वात कमी धावसंख्या

विश्वचषकात भारताने आठ वेळा पाकिस्तानला हरवले

२०२३ : सात गडी राखून विजय, अहमदाबाद
२०१९ : ८९ धावांनी विजय, मँचेस्टर
२०१५ : ७६ धावांनी विजय, अॅडलेड
२०११ : २९ धावांनी विजय, मोहाली
२००३ : सहा गडी राखून विजय, सेंचुरिअन
१९९९ : ४७ धावांनी विजय, मँचेस्टर
१९९६ : ३९ धावांनी विजय, बंगळुरू
१९९२ : ४३ धावांनी विजय, सिडनी


सम्बन्धित सामग्री