Tuesday, September 17, 2024 01:41:31 AM

विराटचा धमाका, कुलदीपचा 'पंच'; भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

विराटचा धमाका कुलदीपचा पंच भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

मुंबई, १२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप सामन्यात विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीतील सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड मोडत मोठा पट्टा पार केला. वनडे क्रिकेटमध्ये या भारतीय दिग्गजाने आपल्या १३००० वनडे धावा पूर्ण केल्या. विराटने या सामन्यात आपले ४७ वे शतक देखील पूर्ण केले. भारत आणि पाकिस्तान संघातील ही लढत फारच रोमांचक ठरली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना रविवारी १० सप्टेंबर रोजी निकाली लागणे अपेक्षित होते. मात्र पावसामुळे हा सामना रविवारी पूर्ण होऊ शकला नाही. सोमवारी भारताने २४.१ षटकात २ बाद १४७ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. विराट कोहली ८ नाबाद आणि केएल राहुल १७ नाबाद धावांपासून पुढे खेळताना सोमवारी अप्रतिम लयीत दिसले. दोघांमध्ये मोठी भागीदारी झालीच. पण विराट कोहलीने वनडे कारकिर्दीत १३००० धावांचा टप्पा पूर्ण केला.

भारतीय संघासाठी या सामन्यात चार फलंदाज खेळण्यासाठी खेळपट्टीवर आले. विशेष म्हणजे या चौघांनीही किमान अर्धशतकी योगदान दिले. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी अनुक्रमे ५६ आणि ५८ धावांची खेळी केली. रोहित आणि गिलने पुन्हा रविवारी सामना थांबण्यापूर्वीच विकेट गमावली होती. पण राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी विराट कोहली आणि केएल राहुल यांनी वैयक्तिक शतके ठोकत भारताची धावसंख्या उंचावली. विराटने ९४ चेंडूत १२२, तर केएल राहुल याने १०६ चेंडूत १११ धावा कुटल्या. या चौघांच्या योगदानामुळे भारताला ३५६ धावांपर्यंत मजल मारता आली.

भारताने दिलेल्या ३५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ फक्त १२८ धावांपर्यंत मजल मारु शकला. कुलदीप यादव याने पाकिस्तानच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. कुलदीप यादव याने फखर जमान, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अशरफ यांना बाद केले. तर इमाम उल हक याला बुमराहने बाद केले. पाकिस्तानने आघाडीच्या चार विकेट झटपट गमावल्या. बाबर आझम, इमाम उल हक, फकार जमान यांना मोठी खेळी करता आली नाही. भारताने दिलेल्या ३५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. सलामी फलंदाज इमाम उल हक स्वस्तात बाद झाला. अवघ्या १७ धावांवर पाकिस्तानला पहिला धक्का बसला. त्यानंतर ४३ धावसंख्येवर दुसरा धक्का बसला. बाबर आझम याला हार्दिक पांड्याने स्वस्तात तंबूत पाठवले. तर इमामचा अडथळा बुमराहने दूर केला. तब्बल ३५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचे आघाडीचे फलंदाज ढेपाळले. बुमराह आणि हार्दिक पांड्याने भेदक मारा करत पाकिस्तानच्या स्टार फंलदाजांना तंबूत पाठवले. त्यानंतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानकडून एक फलंदाज ३० धावसंख्या ओलांडू शकला नाही. फखर जमान याने सर्वाधिक २७ धावांची खेळी केली. त्याशिवाय आगा सलमान आणि इफ्तिखार अहमद यांनी प्रत्येकी २३ धावांची खेळी केली. बाबर आझम याने १० धावा केल्या. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही. हॅरिस रौफ आणि नसीम शाह दुखापतग्रस्त असल्यामुळे फलंदाजीला आले नाहीत. पाकिस्तान संघाने ३२ षटकात ८ बाद १२८ धावा केल्या.

भारताने सुपर ४ च्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला धुळ चारली. या सामन्यापूर्वी आशिया कपच्या गुणतालिकेत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर होता आणि पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानावर होता. पाकिस्तानने यापूर्वी बांगलादेशवर विजय मिळवला होता, त्यामुळे त्यांच्या खात्यात २ गुण होते. पण भारताचा हा पहिलाच सामना होता. त्यामुळे त्यांच्या खात्यात गुण नव्हते. पण या विजयानंतर सर्व समीकरण ब़दलले आहे. कारण या विजयानंतर भारतालाही दोन गुण मिळाले आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या तिन्ही संघांचे समान दोन गुण आहेत. पण भारताने या सामन्यात मोठा विजय मिळवला आणि त्याचा फायदा त्यांना यावेळी झाला आहे. कारण भारताने मोठा विजय मिळवला आणि त्यामुळेच त्यांचा रन रेट चांगलाच वाढला आहे. या सामन्यानंतर भारताचा रन रेट हा ४.५६० एवढा झाला आहे. गुणतालिकेत हा सर्वात जास्त रन रेट आहे, त्यामुळे भारतीय संघाने या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. पाकिस्तानचेही यावेळी दोन गुण असले तरी त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचा रन रेट - १.८९२ असा झाला आहे. हा सर्वात कमी रन रेट आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ हा गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर ढकलला गेला आहे. त्यामुळे भारत या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर भारताने पाकिस्तानवर या स्पर्धेतील सर्वात मोठा विजय साकारला.


सम्बन्धित सामग्री