नागपूर: विधानसभा निवडणुकांच्या निलकानंतर महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा रविवारी (काल) पार पडला. दरम्यान, आजपासून नागपुरात फडणवीस सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. थंडीच्या दिवसातही राज्यात राजकारण मात्र तापलं आहे. विधानसभेच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनानंतर आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरु होत आहे.
नागपुरात सुरू होणारे हिवाळी अधिवेशन हे अल्पावधीचे ठरणार असल्याने राज्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तोडगा निघेल की नाही, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या अधिवेशनात विदर्भाशी संबंधित प्रश्न मार्गी लागणार का, हा मोठा प्रश्न आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस दरांशी संबंधित प्रश्न तसेच ईव्हीएमच्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.
या अधिवेशनात २० विधेयके मांडली जाणार असून, विरोधक सरकारला घेरण्यासाठी आक्रमक भूमिका घेत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून ते निवडणूक प्रक्रियेतील ईव्हीएमच्या मुद्द्यांपर्यंत विविध विषय चर्चेत येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रविवारी महायुती सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार झाला. या विस्तारामध्ये एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यामध्ये ३३ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने अनेक जुन्या चेहऱ्यांना वगळत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
शिंदे गटाकडून ११ मंत्री झाले असून त्यापैकी ५ नवीन चेहरे आहेत. भाजपनेही ८ नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून यामध्ये ५ नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.