छत्रपती संभाजीनगर : देशभर धार्मिक उन्मादाचे वातावरण निर्माण झाले असून, राजकारणाचा सोयीसाठी बेधुंद वापर केला जात आहे. याची परिणती धार्मिक संघर्षात होण्याची शक्यता असून, त्यामुळे भारताच्या ‘गंगा-जमुना’ संस्कृतीला तडा जाऊ शकतो. म्हणून संविधानाच्या चौकटीत राहून शांततामय मार्गाने उठाव करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक राणा यांनी केले.
छत्रपती संभाजीनगरातील आमखास मैदानावर 19 व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. मलिक अंबर साहित्यनगरीच्या व्यासपीठावरून डॉ. राणा बोलत होते. संमेलनात मावळते अध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष सतीश चकोर, मुख्य निमंत्रक ॲड. धनंजय बोरडे उपस्थित होते.
मराठी भाषेचा अभिजात दर्जा आणि बोलीभाषा
डॉ. राणा म्हणाले, "मराठी भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ही आनंदाची बाब आहे. मात्र, हा दर्जा केवळ सदाशिवपेठेतील ब्राह्मणांच्या बोलीपुरता सीमित आहे की महाराष्ट्रातील सर्व विभागांतील बोलीभाषांनाही लागू आहे, हे स्पष्ट झालेले नाही. वऱ्हाडी, मराठवाडी, खान्देशी, अहिराणी, कोकणी, सातारी आणि कोल्हापुरी या बोलींना अभिजात मराठीत कोणते स्थान आहे, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे."
"ते तर भाजपचे अधिवेशन!" – मुलाटे
डॉ. वासुदेव मुलाटे म्हणाले, "दिल्लीतील अ. भा. साहित्य संमेलनात तारा भवाळकर यांची निवड अचूक झाली, पण ते संमेलन साहित्य संमेलन नसून भाजपचे अधिवेशन झाले. इथे मुलींवर बलात्कार होत आहेत, पण मुख्यमंत्री मात्र कार्यक्रमांत व्यग्र आहेत. रामाचे नाव घेणारे मुख्यमंत्री, गृहमंत्री हे माणसाच्या हृदयातील राम पाहू शकत नाहीत. विद्रोहच समानतेचे बीज रुजवू शकतो."
"विचारधारेला विरोध" – प्रा. परदेशी
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी म्हणाल्या, "महात्मा फुलेंना जेव्हा ग्रंथसभेने आमंत्रित केले, तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘तुमचे संमेलन दुहीचे बीज रोवणारे आहे.’ आम्हाला कोणत्याही जातीच्या लोकांशी विरोध नाही, मात्र विषमतेच्या विचारधारेचा आम्ही विरोध करतो. ‘विषमतेला नकार, समतेला होकार’ हे आमचे ब्रीद आहे."
"मनुस्मृती रुजवण्याचे प्रयत्न" – सतीश चकोर
स्वागताध्यक्ष सतीश चकोर म्हणाले, "सामाजिक विषमता समानतेमध्ये रूपांतरित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अलीकडे बेमालूमपणे पाठ्यपुस्तकांमधून मनुस्मृती रुजवण्याचे काम सुरू झाले आहे. याकडे सर्वांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे आणि त्याला विरोध करावा."
संमेलनात प्रा. प्रल्हाद लुलेकर, उर्दू साहित्यिक नुरूल हसनैन, सूर्यकांता गाडे, राज्य संघटक किशोर ढमालेही उपस्थित होते. शीतल गावित यांच्या अखंड गायनाने कार्यक्रम रंगतदार झाला. अमृत भिल यांचे पावरीवादन, नरेंद्र राठोड यांनी सादर केलेले कबीराचे अभंग आणि डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या छक्कड सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. डॉ. किशोर शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. वैशाली डोळस यांनी आभार मानले.