मुंबई : नुकत्याच सत्तेत आलेल्या महायुतीच्या सरकार समोर सध्या दोन आव्हाने प्रामुख्याने उभी ठाकलेली आहेत. बीडच्या मसाजोग इथे झालेली सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी याची परभणीच्या पोलीस कोठडीत झालेला मृत्यू. दोन्ही प्रकरणात महायुतीच्या सरकारवर विरोधक तुटून पडले आहेत. त्यांनीही राज्यात कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप केला आहे.
लातूरच्या रेणापूर इथे रस्त्यावर आलेले हे लोक संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करत आहेत. शुक्रवारी निघालेल्या मोर्च्यात दिवंगत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. संतोष यांच्या मुलीच्या डोळ्यातली आसवं बरंच काही सांगून गेली.
माझ्या वडिलांची हत्या झाल्यानंतर आपण एकत्रित आलात ते असेच राहो. आज आमच्यावर जी वेळ आली ती कोणावर येऊ नये. माझे वडील समाजसेवक होते, त्यांनी आमच्याकडे कधीही लक्ष दिले नाही. रेणापूर हे माझे आजोळ आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या पाठीशी राहा. आज ज्याप्रमाणे आलात त्याप्रमाणे प्रत्येक मोर्चात सहभागी व्हा. माझे वडील आमच्यातून गेलेत पण तुम्ही आमच्या पाठीशी राहा असे संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख म्हणाली.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेम्बर 2024 रोजी अपहरण करून अमानुष हत्या करण्यात आली. त्या हत्येमधील मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याच्या कारणामुळे देशमुख समर्थकांचा पारा चढतोय. सरपंच संतोष देशमुख भाजपाचे कार्यकर्ता होते. विधानसभा निवडणुकीत भाजपाचे बूथ प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं. राज्यात भाजपाची सत्ता असताना त्यांच्या कार्यकर्त्याची झालेली अमानुष हत्या याला विरोधकांनी मुद्दा बनवले आहे. यानिमित्ताने, भाजपासह महायुतीचे आमदारही भाजपाला प्रश्न विचारत आहेत. यात सुरेश धस हे आघाडीवर आहेत . आमदार धस यांच्यामुळे विरोधकांना बळ मिळालं आणि त्यांनी भव्य मोर्च्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाला वेगवेगळे पदर आहेत.
आंदोलनाला वेगवेगळे पदर
- पंकजा आणि धनंजय या मुंडे भावाबहिणीच्या विरोधात बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय एकजूट घडवून आणली जात आहे.
- सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि प्रकाश साळुंके मुंडेंच्या राजकारणाला आव्हान देऊ इच्छित आहेत.
- एकाचवेळी दोन्ही मुंडे मंत्री झाल्याने इतरांना त्यांच्या राजकारणाची काळजी लागलीय.
- आंदोलनाला मराठा विरुद्ध वंजारी संघर्ष कारणीभूत आहे.
- मयत संतोष देशमुख मराठा होते तर मुख्य आरोपी वाल्मिक कराड वंजारी आहे.
- वाल्मिक कराड घटना घडल्यापासून फरार आहे.
हेही वाचा : 'मुंडेंना विनाकारण टार्गेट केलं जातंय'
वाल्मिक कराडची वादग्रस्त पार्श्वभूमी आणि त्याला धनंजय मुंडे यांचे समर्थन हा आता देशमुख हत्या प्रकरणात कळीचा मुद्दा बनला आहे. या गदारोळात मराठा क्रांती ठोक मोर्च्याने आंदोलनात उडी घेत हत्या प्रकरण तपास जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली आहे. दरम्यान पोलिसांनी शनिवारच्या मोर्च्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कंबर कसली आहे. पोलिसांची पुरेशी कुमक बीड इथे पोहचली असून सर्वपक्षीय आंदोलनाच्या निमित्तानं कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न झाला तर पोलीस कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.
एकीकडे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपासासाठी वर्ग झालेले असताना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड पोलिसांकडूनच चौकशी होत आहे हा मुद्दा आंदोलनात उचलला जात आहे. राज्य सरकारकडून मोर्च्यापूर्वी धडक कारवाईची मागणी आंदोलक करत आहेत.