मुंबई: भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांची गटनेतापदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील हे निश्चित झालं आहे. भाजपाच्या सर्व आमदारांनी फडणवीसांच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे. पनवेलमध्ये भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बँडच्या तालावर ठेका धरला. तसेच फटाके वाजवून व एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा केला. त्यानंतर आता शपथविधीसाठीच्या घडामोडींना वेग आला आहे. अशातच उपमुख्यमंत्री पदी कोण असणार? अश्या अनेक चर्चाना उधाण आलं आहे . एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घेणार की नाही याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या आमदार उदय सामंत यांनी 'एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री निश्चित', 'शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावं' असं म्हंटल आहे.
माध्यमांशी बोलताना उदय सामंत काय म्हणाले ?
काल मी स्वतः एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मी देवेंद्र फडणवीसांनाही ही भेटलो. गिरीश महाजन वर्षा बंगल्यावरती एकनाथ शिंदे यांना भेटले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली त्यांचीच चर्चा झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या आजारपणानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंची चौकशी करण्यासाठी आले होते. आम्ही शिवसेनेचे जेवढे आमदार, खासदार आहोत आम्हा सर्वांची प्रौढ इच्छा आहे आमचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांनी करावं अशी आमची स्पष्ट भूमिका आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी असं उदय सामंत म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही, शिवसेना म्हणून शिंदे साहेबांसोबत काम करणाऱ्या सर्व नेत्यांची, आमदारांची, खासदारांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे,असंही विधान उदय सामंत यांनी केलं. राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे निश्चित आहे. त्यामुळे शिवसेना म्हणून शिवसेना आमचे भूमिका मांडण्याचा आणि आमचं मत आमच्या नेत्याकडे मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे. शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी, ही आम्हाला खात्री आहे आणि आम्ही केलेल्या आग्रह महाराष्ट्राच्या हितासाठी केलेला आग्रह आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं, मी पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रात संघटन करेन, संघटनेसाठी काम करेन, पण आम्हाला फक्त तेवढंच नकोय. आम्हाला स्वतःला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं. त्यांनी प्रशासनामध्ये जावं. त्यांनी निर्माण केलेल्या ज्या योजना आहेत, त्याच्यामुळे सरकार येण्यामध्ये ताकद मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी सरकारमध्ये राहावं, त्या योजना पुर्णत्वास न्याव्यात ही आम्हा सर्वांची इच्छा आहे असे उदय सामंत यांनी पुढे म्हटले आहे.