मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद नाकारल्यानं ते सध्या राष्ट्रवादीमध्ये प्रचंड नाराज आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, छगन भुजबळांनी सातत्याने त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचत पक्षनेतृत्वाच्या कारभारावर टीका केली असल्याने भुजबळ अन्य पर्यायांचा विचार करणार अशी जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगू लागल्या. भुजबळ भाजपात जाणार अशीही चर्चा होती. त्या चर्चेवर भाजपाकडून कधीही त्यांनी नकार न देता भाजपात येणाऱ्यांचे स्वागत असल्याचे सांगत भुजबळांच्या भाजपाप्रवेशाला एकप्रकारे संमती दर्शवली होती. आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच तसे संकेत दिल्याने भूजबळांच्या भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी बालभारतीचे पुस्तक वाचलं
फडणवीसांना एक मुलाखतीत बालभारतीचे पुस्तक दिलं. पुस्तक हातात घेतल्यावर ते चाळताना हे पहिलीचं पुस्तक आहे.आमच्यावेळी होतं तेच हे पुस्तक आहे की बदललंय हे पाहावं लागेल. छगन कमळ बघ हे वाक्य आहे का पाहावं लागेल. उपस्थितांनी फडणवीसांच्या या संकेतांना भरभरून दाद दिली.
हेही वाचा : शक्तिप्रदर्शन करत राजन साळवी शिवसेनेत
फडणवीसांच्या या संकेतानंतर नेत्यांनी याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल असं सांगत त्याला दुजोरा दिला. फडणवीसांनी भुजबळांना भाजपात येण्याचे संकेत दिले असले तरी भुजबळांनी मात्र यावर मौन बाळगलंय. भुजबळांनी याप्रकरणी मौन बाळगलं असलं तरी त्यांच्या मौनात अनेक अर्थ दडलेले असावेत असं सांगितलं जात आहे. त्यामुळे येत्या काळात भुजबळांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातून काढत जर कमळ पकडलं तर त्यात फारसं आश्चर्य वाटायला नको.