दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'या' नेत्याला मिळाली सर्वाधिक मते
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक कामगिरी केली. तब्बल 27 वर्षांनंतर आता राजधानी दिल्लीत भाजपचं सरकार स्थापन होणार आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, मंत्री सौरभ भारद्वाज आणि सत्ताधारी पक्षाचे अनेक प्रमुख नेते निवडणुकीत पराभूत झाले आहेत. दरम्यान, दिल्लीत काही नवीन स्टार नेते देखील उदयास आले आहेत, त्यापैकी एक म्हणजे भाजप नेते संदीप सेहरावत. संदीप सेहरावत हे मतियाला मतदारसंघातून विजयी झाले आहे. 2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवण्याचा मान संदीप सेहरावत यांना मिळाला आहे.
हेही वाचा - 'आप'च्या पराभवानंतर दिल्ली सचिवालय सील उपराज्यपालांच्या आदेशानुसार करण्यात आली कारवाई
आपच्या नेत्याचा केला 28723 मतांनी पराभव -
मटियाला येथून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे 32 वर्षीय संदीप सेहरावत यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आम आदमी पक्षाचे सुमेश शोकीन यांचा 28723 मतांनी पराभव केला. संदीप यांना एकूण 146295 मते मिळाली तर शोकीनला फक्त 117572 मते मिळाली. तर, काँग्रेसचे रघविंदर सिंग यांना फक्त 9685 मते मिळाली. संदीप यांना मिळालेली मते ही सध्याच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला मिळालेली सर्वाधिक मते आहेत.
हेही वाचा - देशात भाजपचा झेंडा अटकेपार! आता दिल्लीसह 19 राज्यांमध्ये BJP-NDA युतीचे सरकार
आम आदमी पक्षाने 2015 मध्ये मतियाला विधानसभा जागा भाजपकडून हिसकावून घेतली होती. त्या निवडणुकांमध्ये आपचे उमेदवार गुलाब सिंह यादव यांनी तत्कालीन आमदार आणि भाजपचे उमेदवार राजेश गेहलोत यांचा 47 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. यानंतर, 2020 च्या विधानसभा निवडणुकीत, आपचे उमेदवार गुलाब यांनी ही जागा जिंकली आणि पुन्हा एकदा राजेश गेहलोत यांचा 28 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. तथापि, आता संदीप सेहरावत यांनी सर्वाधिक मताधिक्यांने निवडणून येत मोठा पराक्रम केला आहे.