"ओवैसींना नितेश राणेंचा खडा इशारा – ‘हिम्मत असेल तर महाराष्ट्रात या!’"
अहिल्यानगर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून देशभरात अनेकदा वाद निर्माण होतात. असाच एक वाद खासदार असाउद्दीन ओवैसी यांच्या ट्विटमुळे उफाळला आहे. ओवैसी यांनी ट्विट करत म्हटले की, "छत्रपती शिवाजी महाराज कधीच मुस्लिम विरोधात नव्हते. आम्हीही छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करतो. त्यांच्या सैन्यात मुस्लिम प्रमुख होते."
यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी ओवैसींवर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटले की, "ओवैसी खोटा इतिहास सांगत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी इस्लामीकरणाच्या विरोधात स्वराज्य स्थापन केले. मुघलांनी मंदिरे तोडली आणि हिंदूंच्या विरोधात षडयंत्र रचले. याच अन्यायाविरोधात छत्रपतींनी लढाई लढली."
नितेश राणे यांनी ओवैसींना थेट आव्हान देत सांगितले की, "हिम्मत असेल तर महाराष्ट्रात येऊन दाखवा. आम्ही पाहतो, तो एका पायावर कसा हैदराबादला जातो." त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे.
राज्यात ओवैसींवर आधीपासूनच नाराजीचा सूर आहे. यापूर्वीही त्यांनी अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. मात्र, यावेळी नितेश राणे यांनी थेट इशारा दिल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारधारेचे राजकीय वातावरण अधिक तापलेले आहे. ओवैसींनी केलेल्या विधानानंतर भाजपसह अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. नितेश राणे यांच्या या वक्तव्यावर ओवैसी काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.