मुंबई : महायुतीला भरभरून मतांचं दान मिळूनही सरकार स्थापन करण्यात, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आणि त्यानंतर खातेवाटप- पालकमंत्रिपदाचे वाटप करताना त्याला वादाची किनार होती. तीन पक्षांचं सरकार असल्याने प्रत्येकाची मर्जी सांभाळताना तिघांचे तू तू मैं मैं सातत्याने चव्हाट्यावर आलंय. पालकमंत्रिपदाची यादी जाहिर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना परदेशातून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती द्यावी लागली. रायगड आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी पालकमंत्रिपदासाठी शिवेसना आणि राष्ट्रवादीच कमालीची चढाओढ आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अद्याप कोणताही निर्णय न घेता दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आपसात निर्णय घ्यावा, असे संकेत दिल्याची माहिती भाजपाच्या वरिष्ठांनी दिली आहे.
पालकमंत्रिपदाचा तिढा काय?
रायगडचे पालकमंत्रिपद अदिती तटकरेंना दिल्याने शिवसेना नाराज आहेत. रायगडचे पालकमंत्रिपद शिवेसनेला द्यावं यासाठी शिवसेना आग्रही आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचं वर्चस्व असताना राष्ट्रवादीला झुकतं माप का? नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपाच्या महाजनांना घोषित करण्यात आले. यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष नाराज आहेत. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व असताना भाजपाला पालकमंत्रिपद का? असा सवाल उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा नाशिकासाठी आग्रह, शिवसेनेलाही हवं आहे. नाशिक दोन्ही पक्षांच्या नाराजीमुळे दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे. सत्तेच्या तीन महिन्यानंतरही या दोन जिल्ह्यांना पालकमंत्री नाही. पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून दिल्लीला साकडे घालण्यात येत आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून हा तिढा सोडवण्याचे प्रयत्न होत आहे.
हेही वाचा : धडा शिकवण्यासाठी आपचे नुकसान केलं; काँग्रेस नेत्यांचा अजब दावा
रायगडचे पालकमंत्रीपद सोडण्यास राष्ट्रवादी तयार नाही तर नाशिकसाठी भाजपा अडून राहिली आहे, अशात हा तिढा सुटण्याची शक्यता नसताना आता थेट दिल्ली दरबारात यावर चर्चा झाली असून भाजपाच्या दिल्ली नेतृत्वाने दिलेल्या आदेशानुसार पालकमंत्रिपदावर शिक्कामोर्तब होणार आहे.