महाराष्ट्र: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. राज्य विधानसभेत अर्थमंत्री म्हणून पवार यांनी सादर केलेला हा 11 वा अर्थसंकल्प आहे. “मतदारांनी आमच्या महायुतीला भरभरून कौल दिल्यानंतर मला अर्थमंत्री म्हणून 11वा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांवर मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन,” असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार म्हणालेत. त्यातच आता या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केलीय.
हेही वाचा: Maharashtra Budget 2025: अजित पवार यांच्या भाषणातील ठळक मुद्दे 10
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
मारल्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावरून महायुतीला टोला लगावला आहे. 'महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजपच्या संकल्प पत्रातील एक तरी संकल्प त्यांनी मांडला का? या संकल्पातील एक तरी गोष्ट अर्थसंकल्पात मांडली का? हे संकल्प कधी होणार. 2050 साली करणार? मग याला या वर्षीचा अर्थसंकल्प म्हणता येणार नाही. आधीचे कामे सुरु आहेत. जी कामे नव्याने करणार आहेत, ती उद्या-परवा करू. अशा पद्धतीचं अर्थसंकल्प आहे. अत्यंत बोगस अर्थसंकल्प आहे. एक रुपयांमध्ये विमा होता. ती योजना बंद पडली. या सर्व योजना गडबड घोटाळ्याच्या योजना आहेत'.
'सहकारी साखर कारखाने यांच्या बगलबच्च्यांचे आहेत. या कारखान्यांची थकहमी बंद केली होती. कारण ती लूट आहे. साध्या शेतकऱ्यांना थकहमी देत नाही. महापालिकेची थकहमी कधी देणार. आमच्या काळात आम्ही बेस्टला मदत करत होतो. लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपये दिले नाही. त्यांनी आश्वासन दिलं होतं. पण त्यांनी पूर्ण केलं नाही. मारल्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी. ही लोकांची फसवणूक आहे. फसवणूक करून सत्ता मिळवली आहे. लोकांची आश्वासने पूर्ण करा. आता रस्त्याची कामे काढली आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरायचं कसं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय .