महाराष्ट्र: राज्यात सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेची. महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सर्वत्र महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. परंतु ही रक्कम वाढवून महिलांना दरमहा 2100 रुपये दिले जाणार असे सांगण्यात आले होते. परंतु आजही या लाडक्या बहिणी वाढीव रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच आता लाडकी बहीण योजनेत बदल होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिलीय.
हेही वाचा: Chitra Wagh: महिला सुरक्षित, तरच समाज प्रगतीशील…!
काय म्हणाले अजित पवार?
'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरली. लाडकी बहीण योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा आहे. वित्तमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो, त्यावेळी या योजनेमधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे, याचाही विचार करतो'.
'राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे. जिल्हा सहकारी बँका आहेत. तसेच सहकारी बँकाही आहेत. ज्या महिलांना व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा. म्हणजे, ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर, त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाऊल पुढे टाकू', असं अजित पवार म्हणालेत.
'कारण सुमारे 45 हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत. या माध्यमातून बहीण सक्षम होऊन तिच्या कुटुंबालाही हातभार लावेल, हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटं, मोठं योगदान मिळेल', असंही अजित पवार म्हणाले आहेत.