कोल्हापूर : बेळगावात मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला परवानगी न दिल्यास कानडी मंत्र्यांना कोल्हापुरात बंदी घालण्याचा इशारा उद्धव ठाकरे सेनेकडून कर्नाटक सरकारला देण्यात आला आहे.
बेळगाव येथे होणाऱ्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावला जाण्यापासून कोणताही अटकाव करू नये अशी मागणी आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. 9 डिसेंबर रोजी बेळगाव येथे हा मेळावा पार पडणार आहे. याबाबत निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं आहे. दरवर्षी बेळगाव येथे कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला जातो. मात्र कर्नाटक सरकार दडपशाही करत या मेळाव्यास परवानगी देत नाही. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांनाही बेळगावला जाण्यास अटकाव केला जातो.त्यामुळे आता शिवसेना ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कर्नाटकचे मंत्री करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन बेळगावला अधिवेशनास जात असतात. त्यामुळे कर्नाटक सरकारने दडपशाही करत जर मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी नाकारली आणि महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावला जाण्यास मज्जाव केला. तर महाराष्ट्र सीमेवर कर्नाटकच्या वाहनांना अडवू तसेच कर्नाटकच्या मंत्र्यांना कोल्हापुरात फिरु देणार नाही असा इशारा यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
ठाकरेसेनेचा कर्नाटकला इशारा
मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी नाकारली तर कर्नाटकच्या वाहनांसह मंत्र्यांना कोल्हापूर बंदी करणार असल्याचे ठाकरे सेनेकडून सांगण्यात आले आहेत. 9 डिसेंबरला हा मराठी भाषिक महामेळावा पार पडतो. कर्नाटक सरकार दडपशाहीने मराठी भाषिक मेळाव्यास परवानगी देत नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नेत्यांनाही बेळगावला जाण्यास अटकाव केला जातो. यावर आता ठाकरे सेना आक्रमक झाली आहे. कर्नाटक सरकारने दडपशाही करत जर मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी नाकारली किंवा महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावला जाण्यास मज्जाव केला. तर महाराष्ट्र सीमेवर कर्नाटकच्या वाहनांना अडवू तसेच कर्नाटकच्या मंत्र्यांना कोल्हापुरात फिरु देणार नाही असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाकडून आला आहे.