मुंबई : राज्यात शपथविधीच्या कार्यक्रमाची धामधूम सुरू आहे. महायुतीकडून शपथविधीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. नुकतीच महायुतीच्या नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केली आहे. भाजपाकडून महत्त्वाच्या नेत्यांना तसेच संत व महंतांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे. देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्याना व प्रमुख नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे.
शपथविधीच्या निमंत्रितांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, हरियाणा अशा महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्रप्रदेश मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीन कुमार, अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र यादव, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराडा संगमा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री मानिक साहा, उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी आदी राज्याचे मुख्यमंत्री शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहेत.
शपथविधी सोहळ्यासाठी संत व महंत यांना देखील निमंत्रिक करण्यात आले आहे. नानीदचे नरेंद्र महाराज, भगवानगडचे नामदेव शास्त्री, इस्कॉनचे राधानाथ स्वामी महाराज आणि गौरांगदास महाराज, जनार्दन हरीजी महाराज, प्रसाद महाराज अंमळनेरकर, महानुभाव संप्रदायाचे विध्वंसबाबा व मोहन महाराज, जैन मुनी लोकेश आदी संत व महंतांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे.
महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानाची पाहणी
महाराष्ट्रात 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. मुंबईतील आझाद मैदान परिसरात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. याच आझाद मैदानाची पाहणी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. महायुतीचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, गिरीश महाजन, संजय शिरसाट आणि गुलाबराव पाटील यांच्यासह पदाधिकारी यांनी आझाद मैदानाची पाहणी केली आहे.