मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नव्या सरकार शपथविधी होणार आहे. 5 डिसेंबरला आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. शपथविधीच्या तयारीचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा घेण्यात आला आहे. यावेळी महायुतीचे आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, गिरीश महाजन, संजय शिरसाट आणि गुलाबराव पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. महायुती सरकारच्या शपथविधीसाठी प्रदेश कार्यालयात भाजपची जय्यत तयारी सुरू आहे.पथविधीसाठी एनडीए शासित राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. साधू महंत, कलाकार, साहित्यिक यांनाही निमंत्रित केलं जाणार आहे.
शपथविधी सोहळ्याला विरोधकांना निमंत्रण
शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण राज्यातील प्रमुख नेत्यांना दिले जाणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे सेनेचे अंबादास दानवे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातून जयंत पाटील, वंचित बहुजन आघाडी पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, यांच्यासह इतर पक्षातील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांसह सिनेसृष्टी, क्रीडा क्षेत्र, सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना ही निमंत्रण दिले जाणार असल्याची माहिती आहे.