मुंबई : फडणवीस-शिंदे यांच्यामधील खलबतांचा जोर वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन गिरीश महाजन शिंदेंकडे गेले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्या बंद दाराआड चर्चा झाली आहे. या चर्चेत तिघांमध्ये वर्षा बंगल्यातील मुख्यमंत्र्यांच्या अॅटी चेंबरमध्ये अर्धा तास चर्चा झाली आहे. संभाव्य खाते वाटपावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारीसुद्धा गिरीश महाजन मुख्यमंत्र्याच्या भेटीला त्यांच्या ठाण्यातील बंगल्यावर गेले होते.
मंत्रिपदाकडे महायुतीच्या नेत्यांचे लक्ष
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. आता महायुतीचे सत्ता स्थापनेकडे लक्ष लागले आहे. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. महायुतीच्या नेत्यांकडून शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी केली जात आहे. महायुतीतून भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार यावर जवळपास शिक्कमोर्तब झाले आहे. परंतु कोणाला कुठले मंत्रीपद मिळणार यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. महायुतीच्या नेत्यांकडून मंत्रीपदाची सेंटिंग लावल्याची माहिती मिळत आहे. या दरम्यान एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्यात जी बैठक झाली. या बैठकीत खाते वाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
दिल्लीतील बैठकीनंतर एकनाथ शिंदे त्यांच्या दरे येथील मूळगावी गेले. अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीनंतर नाराज झाल्याच्या राजकीय चर्चा सुरू आहे. शपथविधी अवघ्या काही तासांवर असताना शिंदेंची प्रकृती बिघडल्याचे चित्र आहे. शिंदेंना ताप, खोकला, घसा दुखत असल्याने उपचार सुरू आहेत. पांढऱ्या पेशी वाढल्याने डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे. आज शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून वर्षा बंगल्यावर परतले. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यानंतर नेत्यांशी चर्चा करत असल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी संभाव्य खाते वाटपावरून गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा केली असल्याची सूत्रांची माहिती आहे.