छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. या वेळी कोण विजयी होणार, याची खात्री कुणीही देत नसले तरी रंगांच्या बाजारात तब्बल १ हजार किलो हिरव्या रंगाची बुकिंग करण्यात आली आहे. घाऊक विक्रेत्यांनी हिरव्या रंगाचा ५ हजार किलोचा स्टॉक ठेवलेला आहे. हिरव्या रंगाला केशरी गुलालापेक्षा जास्त मागणी आहे.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, एमआयएम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह ३७ उमेदवार शर्यतीत आहेत. मतमोजणीचा दिवस जवळ येत आहे, तशी निकालाची उत्कंठा वाढत आहे. आपलाच उमेदवार विजयी होणार याची खात्री असल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी दुकानांमध्ये पक्षांशी संबंधित रंगांचा साठा करून ठेवला आहे.