मुंबई : नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपाची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीसाठी केंद्रीय निरीक्षक उपस्थित होते. त्या बैठकीनंतर भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड केली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले आहे.
भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक
भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण आणि भाजपाचे नेते विजय रूपानी महाराष्ट्रात केंद्रीय निरीक्षक म्हणून आले होते. केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव एकमताने ठरवण्यात आले. या बैठकीत भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
विधानभवनातच भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीला भाजपाचे सर्व 132 आमदार उपस्थित होते. त्याचबरोबर भाजपाला पाठिंबा देणार अपक्ष आमदारही बैठकीसाठी हजर होते. भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर भाजपाच्या गटनेतेपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीनंतर विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव गटनेतेपदासाठी ठेवण्यात आला. या प्रस्तावाला सर्व आमदारांनी एकमुखाने अनुमोदन दिले.
सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा केला जाणार
गेल्या काही दिवसांपासून राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मात्र आता फडणवीस यांची भाजपाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आज दुपारी साडेतीन वाजता सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यासाठी भाजपाचे गटनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार हे तिघेही राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्या भेटीत राज्यात सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांना पत्र दिले जाईल. त्यानंतर सत्तास्थापनेची प्रक्रिया चालू होईल.