कोलकाता : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय प्राप्त केला. आम आदमी पक्षाकडून सत्ता खेचून आणल्यानंतर भाजपने विविध राज्यात आनंदोत्सव साजरा केला. तब्बल 27 वर्षांनी दिल्ली भाजपच्या हातात आली आहे. दिल्लीच्या निकालानंतर माध्यमांशी बोलत असताना पश्चिम बंगालमधील भाजप नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, “दिल्ली की जीत हमारी, 2026 मै बंगाल की बारी” दिल्ली जिंकल्यानंतर आता बंगालमध्येही विजय मिळवू, असे सूचक विधान त्यांनी केले.
2026 में बंगाल की बारी
आता सुवेंदु अधिकारी यांनी दिल्लीतील विजयाचा आनंद व्यक्त करत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आव्हान दिले आहे. बंगालमधील भाजपाचे आणखी एक नेते सुकांता मजुमदार म्हणाले, पुढील निवडणुकीत बंगालमधील जनताही दिल्लीप्रमाणेच मतदान करेल. अधिकारी आणि मजुमदार या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत राहणाऱ्या भाजपला मतदान केलेल्या बंगाली मतदारांचे आभार मानले. ममता बॅनर्जी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिला होता.
2020 साली झालेल्या निवडणुकीत भाजपला केवळ 8 जागा जिंकता आल्या होत्या. तर त्याआधी 2015 साली त्यांना केवळ तीन जागा मिळण्याची नामुष्की भाजपवर आली होती. यावेळी भाजपने जोरदार मुसंडी मारत 48 जागा जिंकल्या आहेत. तर तीन वेळा सत्ता भोगणाऱ्या आम आदमी पक्षाला केवळ 22 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
भाजपचे बंगालवर लक्ष
पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. मागील निवडणुकांमध्ये दिल्लीप्रमाणेच इथेही भाजपला यश मिळालेले नाही. गेल्या दशकभरापासून इथे ममता बॅनर्जी यांची सत्ता आहे. भाजपाच्या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांना दिलेला इशारा महत्त्वाचा ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील काही निवडणुकांत पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचार करूनही 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे अधिक खासदार निवडून आले. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा विजय झाला. तसेच 2021 च्या कोलकाता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही तृणमूलने भाजपचा जोरदार पराभव केला.
हेही वाचा - Delhi Election Result : 'आप'चं गणित कुठे चुकलं की काय? काय असू शकतात मागे पडण्याची कारणं?
पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष उडाल्याचे अनेकदा दिसून आले आहे. निवडणुकीपूर्वी आणि निकालानंतर दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करण्यात गुंतले होते. त्यातून अनेक ठिकाणी लहान-मोठ्या हिंसाचाराच्या घटना घडल्या. यामध्ये अनेकांचा बळीही गेला आहे. गेल्या वर्षात संदेशखाली लैंगिक अत्याचार प्रकरण, आर. जी. कार रुग्णालयातील डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणात भाजपाने तृणमूल काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली दिसली.
हेही वाचा - Delhi Election Result 2025: 'त्यांच्या डोक्यात नाही आलं.. दारू, पैशामध्ये वाहून गेलं'; अण्णा हजारेंचे मोठे विधान
इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी पाठिंबा मिळावा, यासाठी ममता बॅनर्जी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिला होता. दिल्लीत 'आप'चे पारडे जड ठरले असते तर, याचा तृणमूलला फायदा झाला असता. येत्या विधानसभा निवडणुकीत बॅनर्जी यांना ' आप'ची साथ मिळाली असती. मात्र, दिल्लीतील केजरीवालांच्या पराभवामुळे आता राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.