मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार कालपासून नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा आहेत. सोमवारपासून राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात देखील उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थिती नव्हते. उपमुख्यमंत्री अजित पवार कालपासून दिल्लीत असल्याची माहिती आहे.
खातेवाटप संदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी अजित पवार दिल्लीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे काल आणि आज अजित पवार कोणालाही भेटले नाही किंवा विधिमंडळातही आले नाहीत. महिला व बालविकास विभाग आणि अर्थ खात्याचा पेच असल्याने अजित पवार दिल्लीत आहेत. तर दुसरीकडे मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे.
अर्थ आणि महिला आणि बाल विकास खात्यासाठी भाजपा आग्रही
आदिती तटकरे यांच्याकडे असलेल्या महिला आणि बाल विकास विभागासाठी पंकजा मुंडे आग्रही आहेत. तर अर्थ खात्यासाठी भाजप आग्रही असल्याचे चित्र आहे.परंतु अदिती तटकरे यांना महिला व बालविकास खाते मिळावे अशी राष्ट्रवादी पक्षाची इच्छा असल्याने अजित पवार भाजपाच्या वरिष्ठांशी चर्चा करणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणार अर्थ खात्यावर भाजपाकडून दावा केला जात आहे. मात्र अर्थ खात्यावर अगदी सुरूवातीपासून राष्ट्रवादी ठाम आहे. अर्थ खाते राष्ट्रवादीलाच मिळावे अशी अजित पवारांसह राष्ट्रवादीची इच्छा आहे. त्यामुळे अजित पवार भाजपाच्या वरिष्ठांशी खातेवाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले असल्याची माहिती आहे.
अजित पवारांना सार्वजनिक बांधकाम विभाग देण्याचा भाजपचा प्रस्ताव
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सार्वजनिक बांधकाम विभाग देण्याचा भाजपचा प्रस्ताव असल्याची चर्चा आहे. मात्र महिला व बालविकास विभाग आणि अर्थ खाते राष्ट्रवादीला मिळावे यासाठी अजित पवार आग्रही असल्याचे चित्र आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अजित पवार कालपासून दिल्लीत असल्याची माहिती आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होऊनही अजून खाते वाटप जाहीर झाले नसल्याची चर्चा आहे. नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झाला असून आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाला नाही. भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत.