Sunday, January 19, 2025 03:16:03 PM

Best wishes to Fadnavis from Raj Thackeray's post
राज ठाकरेंच्या पोस्टमधून फडणवीसांना शुभेच्छा, तर....

राज ठाकरेंनी महायुती सरकारला शुभेच्छा दिल्या.

राज ठाकरेंच्या पोस्टमधून फडणवीसांना शुभेच्छा तर

 

मुंबई : राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. आज आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. महायुती सरकारवर राज्यातून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच राज ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी महायुती सरकारला सत्ता स्थापनेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

राज ठाकरेंची पोस्ट

आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी  तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन.

२०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.

पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल.

पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की...

 

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा !

 

राज ठाकरे.

 


सम्बन्धित सामग्री