मुंबई : सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अद्यापही आजारी असल्याचं समजतं आहे. शिंदेंची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी करण्यात आली. मात्र त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तरीही शिंदेंच्या पांढऱ्या पेशी वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांना अजूनही उपचाराची गरज असून त्यांना अशक्तपणा आला असल्याने त्यांना ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तेथील डॉक्टरांची टीम त्यांची उपचार करणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या दिल्लीतील बैठकीनंतर मुंबईत न थांबता सातऱ्यातील त्यांच्या मुळगावी दरे येथे गेले. त्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू झाल्या. शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदे आजारी असल्याचे सांगितले. त्यानंतर शिंदे यांनी स्वत: माध्यमांशी संवाद साधला. शिंदे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शिंदे तब्येतीबद्दल माहिती दिली. त्यानंतर ते ठाणे येथे गेले. तरीही त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. घसा दुखत असल्याने त्यांना ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिंदेंच्या पांढऱ्या पेशी वाढल्याने आहेत. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांना आणखी दोन दिवस आरामाचा सल्ला दिला आहे. तब्येत बरी नसल्याने शिंदे कुठल्याच बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी शिवसेनेचे नेते आजही त्यांच्या ठाणे निवासस्थानी येत आहेत. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, भरत गोगावलेंनी आज शिंदेंची भेट घेतली.
5 डिसेंबरला आझाद मैदानावर महायुतीच्या नेत्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांकडून शपथविधीची जय्यत तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनामध्ये ही बैठक झाली. बैठकीला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, प्रोटोकॉल विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.