लातूर : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळल्याच्या घटनेमुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे सरकारवर चौफेर टीकेचा भडिमार सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेची माफी मागत दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे.
अजित पवार यांनी स्पष्ट केले की, पुतळा वाऱ्यामुळे पडला असला तरीही या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी राज्यातील १३ कोटी जनतेची माफी मागत राज्यात अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने लातूर येथे आयोजित सभेत बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे योगदान राष्ट्रनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि त्यांचे विचार आपल्याला सदैव प्रेरणा देत असतात. त्यामुळे अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही असेही त्यांनी सांगितले.
याशिवाय अजित पवार यांनी बदलापूर येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या घटनेवरही दुःख व्यक्त केले. महिला सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.