मुंबई : महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खूप चर्चेत राहिली आहे. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्यता केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रूपये दिले जातात. या योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 3 हजार महिलांनी एक अनोखा उपक्रम केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आदिती तटकरे यांनी केलेली पोस्ट
जुलै २०२४ मध्ये "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू झाली. ही योजना सुरू झाल्यापासून राज्यातील महिलांच्या जीवनात झालेला सकारात्मक बदल खरोखर मनाला समाधान देणारा आहे. या सकारात्मक बदलाचे एक अत्यंत आशादायी उदाहरण म्हणजे नागपुरातील महिलांनी सुरू केलेली सहकारी पतसंस्था ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जवळपास ३००० लाभार्थी भगिनींनी एकत्र येऊन ही सहकारी पतसंस्था सुरू केली. ही पतसंस्था स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी राहिली असून, इतर महिलांनाही या पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होत आहे. सहकारातून समृद्धीची यशोगाथा लिहिणाऱ्या या भगिनींसोबत संवाद साधण्याची संधी आज मला मिळाली. यावेळी त्यांच्या पतसंस्थेची गेल्या काही महिन्यांतील वाटचाल ऐकून अभिमान वाटला. महिला व बालविकास विभागाच्या माविम व इतर उपक्रमांसोबत त्यांच्या पतसंस्थेला जोडून त्यांच्या वाटचालीला गती देण्यासाठी मी प्रयत्नशील असेन हा विश्वास यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा : पोलीस अधिकारी महाजन यांना सस्पेंड करा; सुरेश धस यांची मागणी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून नागपुरातील 3 हजार महिलांनी सहकारी पतसंस्था सुरू केली आहे. यामुळे राज्यातील महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झालेला आहे आणि ते बदल मनाला समाधान देणारा असल्याचे महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी म्हटले आहे. महिलांनी एकत्र येऊन सहकारी पतसंस्था सुरू केली. या पतसंस्थेच्या माध्यमातून इतर महिलांनाही कर्ज उपलब्ध होत आहे. नागपुरच्या महिलांनी केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
काय म्हणाल्या मंत्री आदिती तटकरे?
सहकारातून समृद्धीची यशोगाथा लिहिणाऱ्या या भगिनींसोबत संवाद साधण्याची संधी मला मिळाली. यावेळी त्यांच्या पतसंस्थेची गेल्या काही महिन्यांतील वाटचाल ऐकून अभिमान वाटला. महिला व बालविकास विभागाच्या माविम व इतर उपक्रमांसोबत त्यांच्या पतसंस्थेला जोडून त्यांच्या वाटचालीला गती देण्यासाठी मी प्रयत्नशील असेन हा विश्वास मंत्री तटकरे यांनी व्यक्त केला आहे.