मुंबई, ९ मे २०२४, प्रतिनिधी : १९९३ च्या बॉम्बस्फोटचा आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ फिरताना दिसत आहे, असा आरोप भाजपनं केला आहे. मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं समर्थन महाविकास आघाडीचे उमेदवार घेताना दिसत आहे. असा आरोप भाजपानं केला तर दुसरीकडे शिउबाठाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस धाडण्यात आली आहे. सलीम कुत्ता पार्टीप्रकरणी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. या सर्व घटनेमुळे राजकारण चांगलंच तापलंय पण या निमित्ताने मुद्दा उपस्थित होतोय तो म्हणजे असा की बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदच्या टोळीतील लोकांशी सातत्याने शिउबाठाच्या नेत्यांचा संबंध का येतो ? याबाबत काय घडामोडी पुढे आल्या पाहुयात…
मुसा उर्फ बाबा चव्हाण हा उत्तर पश्चिमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या प्रचार रॅलीत दिसून आला. या प्रचार रॅलीचा व्हिडीओ भाजपच्या हाती लागला असून भाजपनं या व्हिडीओवरुन थेट उद्धव ठाकरेंना थेट प्रश्न विचारला आहे. तसेच, त्यांचं असं म्हणणं आहे की, उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की, ते नेमके कोणासोबत आहेत? ते मुंबईकरांसोबत आहेत की, १९९३ वेळी ज्यांनी मुंबईकरांना त्रास दिला त्यांच्यासोबत आहे? असे प्रश्न भाजपच्या वतीनं ठाकरेंना विचारण्यात आले आहेत. त्यासोबतच १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर बाळासाहेब खूपच संतापलेले होते आणि त्यांनी अत्यंत परखड भूमिका घेतली होती. पण तुम्ही आता १९९३ च्या आरोपींनाच सोबत घेतलंय. तुम्हाला मुंबईकरांना नेमकं काय द्यायचंय? असा प्रश्नही भाजपनं विचारला आहे.
कोण आहे इकबाल मुसा ?
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी
बॉम्बस्फोटापूर्वी संजय दत्तला शस्त्र पुरवल्याचा आरोप
१९९३च्या बॉम्बस्फोटात २५६ लोकांचा बळी
गुन्हेगारांसोबत शिउबाठा नेत्यांचे जवळीक ?
नाशिक जिल्ह्यातील शिउबाठा गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली. सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढली आहे. मात्र सुधाकर बडगुजर यांनी ही नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आता याप्रकरणी सुधाकर बडगुजर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे बोललं जात आहे. सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजर यांचे नाव चर्चेत आले होते. त्यानंतर आता पोलिसांनी तडीपारची नोटीस काढल्याने सध्या नाशिकचं राजकारण ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकमधून पाठ फिरताच ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याविरोधात नोटीस आल्याने शिउबाठा गट आक्रमक झाला आहे. तसेच ऐन निवडणुकीच्या काळात सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात नोटीस काढल्याने सध्या राजकीय वातावरण तापलं आहे.
कोण आहेत सुधाकर बडगुजर?
शिउबाठा गटाचे नाशिकचे जिल्हाप्रमुख
संजय राऊत यांचे कट्टर समर्थक
महापालिकेत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले
सभागृह नेता, विरोधी पक्षनेतापद सांभाळले
नाशिक पश्चिम इथे २०१४ला शिवसेनेचे उमेदवार होते.
भाजपच्या सीमा हिरे यांच्याकडून पराभूत झाले.
तीन वर्षांपूर्वी शिउबाठा नाशिक महानगरप्रमुखपदी नियुक्ती