Tuesday, July 09, 2024 01:53:00 AM

प्रचार निवडणुकीचा, मुद्दा हिंदू - मुसलमानांचा

प्रचार निवडणुकीचा मुद्दा हिंदू - मुसलमानांचा

नवी दिल्ली, २५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात देशात राजकीय पक्षांनी, विशेषत: भाजपने, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार केला. भाजपाने दुसऱ्या टप्प्यात प्रचाराचा गियर बदलला आणि टीकेची दार अधिक तीक्ष्ण केली. मुख्य म्हणजे पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील काही मुद्द्यांवर थेट हल्ला चढवला आणि लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा हिंदू मुसलमान आणि मंगळसूत्रापर्यंत जाऊन पोहोचला… काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय आहे ज्यावर पंतप्रधान मोदी संतापले…लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील संपत्ती आणि उत्पन्नातील असमानता दूर करण्याच्या काँग्रेसच्या आश्वासनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरपूस समाचार घेतला.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या सुरू आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान नुकतेच पार पडले असून, दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ठिकठिकाणी सभा घेऊन विरोधकांवर टीकास्त्र डागत आहेत; तर दुसरीकडे, विरोधकही मोदी सरकारविरोधात जोरदार प्रचार करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडेच एका सभेत काँग्रेसवर केलेली टीका सध्या चर्चेचे कारण ठरली आहे. “काँग्रेस सत्तेत आली, तर जनतेचा पैसा जास्त मुले असणाऱ्यांना वाटून टाकेल”, असे विधान त्यांनी केले आहे. अर्थातच, पंतप्रधान मोदी या विधानाद्वारे देशातील मुस्लिमांविषयी बोलले आहेत. काँग्रेस आणि मोदी विरोधी आघाडीचा देशातील जनतेच्या कमाईवर डोळा असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. अलीगढमधील सभेत काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, “कोण किती कमावतो, कुणाकडे किती संपत्ती आहे, कुणाकडे किती पैसे आणि घरे आहेत, याचा तपास केला जाईल, सरकार अशा श्रीमंतांच्या संपत्तीचा ताबा घेईल आणि ती सर्वांना वाटून टाकेल. आपल्या माता-भगिनींकडे असलेले सोने हे स्त्रीधन मानले जाते, ते पवित्र मानले जाते. तुमच्या मंगळसूत्रावरही त्यांचा डोळा आहे. ही गोष्ट फारच लज्जास्पद आहे. असं पंतप्रधान मोदी म्हणाले त्यानंतर आता देशभरात मंगळसूत्र प्रकरणावरून वादंग सुरु झाला आहे. मोदींच्या या वक्तव्यानंतर राज्यातही याचे पडसाद उमटले उद्धव यांनी मोदींच्या या टीकेवर निशाणा साधला त्यानंतर भाजपा सुद्धा मैदानात उतरली. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लक्ष्य करताना म्हटले आहे, “आधी जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा त्यांनी सांगितले होते की, देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार? तर ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना वाटणार, घुसखोरांना वाटणार. तुमच्या कमाईचा पैसा घुसखोरांना दिला जावा का? तुम्हाला हे मान्य आहे का”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित जनतेला केला. “काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्येच हे लिहिले आहे की, ते माता-भगिनींच्या सोन्याचा हिशेब करतील आणि मग ती संपत्ती वाटून टाकतील. मनमोहन सिंग सरकारने म्हटले होते की, देशातील संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. ही अर्बन नक्षल विचारधारा तुमचे मंगळसूत्रही वाचू देणार नाही.” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या या वक्तव्यावर आक्षेप घेत, निवडणूक आयोगामध्ये तक्रार करणार असल्याचे काँग्रेसने सांगितले आहे. काँग्रेस सत्तेत आल्यावर इतरांचे आरक्षण काढून मुसलमानांना देणार म्हणून त्यांना जातनिहाय जनगणना करायची आहे अशी टीका मोदींनी केली त्यावर राहुल गांधी यांनी आपण असं काहीच करणार नसल्याचं म्हटले…

भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २००६ साली राष्ट्रीय विकास परिषदेच्या (NDC) बैठकीत एक भाषण केलं होतं. तिथे भाषण करताना मनमोहन सिंग यांनी जे वक्तव्य केलं होत त्या वक्तव्याच्या आधारावर पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हा आरोप केला आहे. तत्कालीन पंतप्रधान मंजोहान सिंग यांनी २००६ साली भाषणात काय म्हटले होते पाहुयात…

काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काय म्हटले आहे?

संपत्ती आणि उत्पन्नातील वाढती विषमता रोखण्यासाठी आवश्यक बदल करू.
जाहीरनाम्यातील पहिल्या प्रकरणातच देशातील जातिभेदावर भाष्य आहे.
देशात अनुसूचित घटकांची लोकसंख्या जवळपास ७० टक्के आहे.
उद्योग आणि सेवा क्षेत्रामधील ओबीसींचे प्रतिनिधित्व अत्यंत कमी आहे.
जातींची सामाजिक-आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जाईल.
या जनगणनेच्या आधारे सामाजिक विषमता कमी करण्यासाठी पावले उचलली जातील.
अल्पसंख्याकांचे आर्थिक सक्षमीकरण केले जाईल.
अल्पसंख्याकांना कर्जेही उपलब्ध करून दिली जातील.
विविध उपक्रमांमध्ये भेदभाव न करता अल्पसंख्याकांना संधीची समानता दिली जाईल.

राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेसोबतच आर्थिक-सामाजिक सर्वेक्षणाचा मुद्दा यापूर्वीही लावून धरला आहे. “दलित, आदिवासी, मागास आणि अल्पसंख्याक समाजातील ८८ टक्के लोक गरीब असल्याचे बिहारच्या जात सर्वेक्षणातून समोर आले आहे. बिहारची ही आकडेवारी म्हणजे देशाच्या वास्तवाची एक छोटीशी झलक आहे”, असेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसचं सरकार येताच देशात जातनिहाय जनगणना केली जाईल असं वक्तव्य आधी राहुल गांधी यांनी केलं होत.

काँग्रेस देशाच्या संसाधनांवर आणि संपत्तीच्या पुनर्वितरणाचा पहिला अधिकार मुस्लिमांना देण्याचे काम करत असल्याचा आरोप केल्यानंतर काही दिवसांनी काँग्रेसवर आपला हल्ला वाढवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले की पक्षाची नजर आता सर्व भारतीयांच्या संपत्तीवर आहे. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेतील वारसा कर ही एक कल्पना आहे. ज्यावर भारतातही चर्चा केली जाऊ शकते या टीकेचा संदर्भ देत मोदींनी छत्तीसगडमधील सुरगुजा येथे एका सभेला संबोधित करताना गांधी कुटुंब आणि काँग्रेसवर निशाणा साधला.

मंगळसूत्राबाबत पंतप्रधानांच्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी देशातील संपत्तीच्या वाटपाबाबत अमेरिकेतील वारसा कराची वकिली केल्याने बुधवारी नवा वादंग निर्माण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने बचावात्मक पवित्रा घेतलेल्या काँग्रेसने पित्रोदा यांच्या विधानाबाबत हात झटकले. पित्रोदा यांच्या वक्तव्याबाबत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी हात झटकले. ‘पित्रोदा हे माझ्यासह जगभरातील अनेक लोकांचे गुरु, मित्र, तत्त्वज्ञानी आणि मार्गदर्शक आहेत. त्यांचे म्हणणे संदर्भ सोडून पाहणे म्हणजे नरेंद्र मोदींच्या द्वेषपूर्ण आणि खोडसाळ निवडणूक प्रचारापासून लक्ष विचलित करण्याचा भाजपचा हेतुपुरस्सर आणि हताश प्रयत्न आहे,’ असे जयराम रमेश म्हणाले. वारसा कर लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे रमेश यांनी स्पष्ट केले. तत्कालीन अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी वारसा कर लागू करण्याची भूमिका मांडली होती. मोदी सरकारच वारसा कराबाबत अनुकूल भूमिका घेत असल्याचा आरोप रमेश यांनी केला. दरम्यान, हे आपले वैयक्तिक मत असून, त्याचा पक्षाशी संबंध नसल्याचा खुलासा पित्रोदा यांनी केला. हे धोरण पक्षाने स्वीकारलेच पाहिजे, असेही नव्हे, असे पित्रोदा म्हणाले. याआधी पित्रोदा यांनी निवडणुकीच्याच तोंडावर दिल्लीतील शीख हत्याकांडाबाबत, ‘हुवा तो हुवा’ असे वादग्रस्त विधान केले होते. त्या वेळीही ते भाजपला प्रचारात फायदेशीर ठरले होते.

कोण आहेत पित्रोदा ?

ओडिसा - तितिलागड येथे १९४२ जन्म झाला.
पूर्ण नाव सत्यनारायण गंगाराम पित्रोदा आहे.
दूरसंचार शोधक, उद्योजक, विचारवंत आणि धोरण निर्माता
नेहरू-गांधी घराण्याचे विश्वासू मानले जातात
राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांचे सल्लागार म्हणून काम केले.
१९८९ मध्ये दूरसंचार आयोगाचे पहिले अध्यक्ष झाले.
२००५ ते २००९ राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष होते.
पित्रोदा राहुल गांधी यांच्या आंतरराष्ट्रीय भाषणाचे आयोजक.

पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची ही पहिली वेळ नाही. अलीकडच्या काही वर्षांत पित्रोदांनी अनेक अशी वक्तव्ये केली, जी वादग्रस्त होती. त्यावरही एक नजर टाकुयात

२०१९ - मध्यमवर्गाने सर्व गरीब कुटुंबांसाठी अधिक कर भरायला हवा
त्यांना स्वार्थी होऊन जमणार नाही. या विधनानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना स्पष्ट करावे लागले की, काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास मध्यमवर्गावर अतिरिक्त कराचा बोजा वाढणार नाही.

बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पित्रोदा बोलले, “मुंबईतही हल्ला झाला होता. आम्ही सुद्धा विमाने पाठवली असती, पण ते योग्य नाही. काही दहशतवाद्यांसाठी संपूर्ण राष्ट्राला लक्ष्य करू नका.

जून २०२३ - मंदिरे रोजगार निर्माण करणार नाहीत. संपूर्ण देश रामजन्मभूमीवरच बोलतो, तेव्हा त्रास होतो. राष्ट्रीय समस्या म्हणजे शिक्षण, रोजगारवाढ, महागाई त्याबद्दल कोणी बोलत नाही

२०२४ - संविधानाचे श्रेय आंबेडकर नाही नेहरूंना द्या


सम्बन्धित सामग्री