Tuesday, July 02, 2024 11:53:52 PM

तुतारी एक, उमेदवार अनेक

तुतारी एक उमेदवार अनेक

पुणे, २३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक अर्ज मागे घ्यायचा सोमवारी शेवटचा दिवस होता, यानंतर आता कुणाचा सामना कुणाविरुद्ध होणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता निवडणूक आयोगाने उमेदवारांना निवडणूक चिन्हही दिलं आहे. यातल्या एका निवडणूक चिन्हावर सुप्रिया सुळेंनी आक्षेप घेतला आहे. कारण बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांची डोकेदुखी वाढणारी ही बाब आहे निवडणूक आयोगाकडून बारामती लोकसभा मतदारसंघातून एका अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह दिलं आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढणाऱ्या सोहेल शेख या उमेदवाराला ट्रम्पेट म्हणजेच तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिलं आहे. मात्र या चिन्हाला सुप्रिया सुळेंकडून हरकत घेण्यात आली आहे. याबाबतचं पत्र सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाला मेल करून पाठवलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस आहे, तर अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिलं गेलं आहे, यामुळे मतदारांचा गोंधळ होऊ शकतो, असं सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिल्यानंतर मतदारांचा गोंधळ होऊ शकतो. हा गोंधळ टाळण्यासाठी चिन्हाचं मराठी नाव बदलावे. नावातील तुतारी हा शब्द बदलून त्याऐवजी दुसरा शब्द निवडणूक आयोगाने द्यावा, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.

सुळेंच्या हरकती पत्रात काय ?

सोमवारी ३५ बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारांचे चिन्ह वाटपाबाबत आपण बैठक बोलवली होती.
सदर बैठकीमधे आम्हास आमच्या पक्षाकरिता राखीव असलेले चिन्ह (तुतारी फुंकणार माणूस) बहाल केले.
परंतु अपक्ष उमेदवार सोयल शहा युनूस शहा शेख यांना तुतारी चिन्ह वाटप केले आहे.
सदर वाटपास आमची हरकत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह बहाल केलं होतं. त्यानुसार लोकसभा निवडणुकीला शरद पवारांचा पक्ष तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहे. बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरत असून त्या तुतारी चिन्हावर लढत आहेत. परंतु सोहेल शेख नावाच्या व्यक्तीनेही बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला असून त्यालाही 'तुतारी' नावाचं चिन्हच बहाल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नावात साम्य असलं, तरी चिन्हाचं स्वरुप वेगळं आहे. परंतु इंग्रजीत Trumpet नाव असल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या कायदेशीर सल्लागार टीमच्या वतीने हरकत घेण्यात आली आहे.

सुप्रिया सुळे यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यावर आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले असून त्यांचा आक्षेप फेटाळला आहे. तुतारी चिन्ह आणि तुतारी वाजवणारा माणूस हे दोन वेगवेगळे चिन्ह असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी परिपत्रक जारी करत सुप्रिया सुळे यांच्याकडून आलेल्या आक्षेपावर स्पष्टीकरण दिले आहे. काय स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलंय पाहुयात….

अपक्ष उमेदवार शेख सोयल यांना अराखीव/ खुल्या चिन्हांपैकी चिन्ह दिले आहे.
तुतारी हे चिन्ह त्यांच्या मागणी केलेल्या पसंतीक्रमानुसार देण्यात आले आहे.
प्रस्तुत चिन्ह भारतीय निवडणूक आयोगाने निर्धारित करून दिले आहे
यामध्ये कोणताही बदल करण्याचा अधिकार नाही
दोन्ही चिन्हांच्या प्रतिकृती वेगवेगळ्या आहेत.
या चिन्हांची मरीठीतील नावेही भिन्न आहेत.
त्यामुळे त्यावर आलेला आक्षेप अमान्य आहे.

निवडणूक आयोगानुसार दोन्ही चिन्ह वेगळी आहेत. चिन्हांची प्रतिकृती वेगळी आहे. नाव सारखे असले तरी चिन्ह वेगवेगळी आहेत - भारत निवडणूक आयोग

बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद सुप्रिया सुळे विरुद्ध भावजय सुनेत्रा अजित पवार अशी लढत रंगणार आहे. म्हणून अवघ्या देशाचं लक्ष या मतदारसंघावर लागून राहिलं आहे. परंतु आता निवडणूक चिन्हाच्या घोळामुळे सुप्रिया सुळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची भीती आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज माघार घेण्याची काल शेवटची तारीख होती. ४६ जणांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यापैकी आठ जणांनी अर्ज माघारी घेतला, तर दोघा जणांचा अर्ज बाद करण्यात आलं आहे. साधारण ३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी सोहेल शेख हे मूळचे बीडचे राहणारे आहेत. परंतु त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरला आहे.

या प्रकारावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून, असं करू नये हा आमच्या वरती अन्याय आहे असं सांगितलेलं आहे. हा अन्याय दोन्ही उमेदवारांवर असून, अपक्ष उमेदवार शेख यांच्यावर देखील हा अन्याय आहे. एक तर शेख हे बीडचे कोण गृहस्थ आहेत जे बारामतीमध्ये लढायला आले आहेत. ते कोण आहेत? कुठून आलेत ? हे आम्हाला माहिती नाही परंतु हा त्यांच्या वरती आणि माझ्यावरतीही अन्याय आहे. सांगायचं झालं तर हा रडीचा डाव असल्याचा आरोपदेखील सुप्रिया सुळे यांनी केला.

लोकसभेचा निवडणुकीत मतदारांना चकवा देण्यासाठी रायगडमध्ये राजकीय खेळी खेळण्यात येत आहे. नावाशी साधर्म्य असणारे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. रायगडमध्ये तीन गीते, दोन तटकरे (तटकरे, तटकरी) यांनी अर्ज दाखल केले आहेत. महायुतीकडून सुनिल तटकरे आणि महाविकास आघाडीकडून अनंत गीते हे रायगडमध्ये लढत आहेत. या दोन्ही प्रमुख उमेदवारांची नावाशी साधर्म्य नाव असलेल्या अन्य उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. यामुळे अनंत गीते आणि सुनील तटकरे यांना फटका बसणार का हे निकालानंतरच स्पष्ट होईल

रायगड लोकसभेतील उमेदवार कोणकोण आहेत पाहुयात…

अनंत गंगाराम गीते शिउबाठा

अनंत पद्मा गीते अपक्ष

अनंत बाळोजी गीते अपक्ष

सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस

सुनील तटकरी अपक्ष

सुनील तटकरे यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक अनंत गीते यांच्या विरोधातच लढवली होती, त्यावेळी त्यांच्यासोबत सुनील तटकरे नावाचा दुसरा उमेदवार होता, त्याला 9 हजार 849 मते मिळाली होती. यामुळे तटकरेंचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता. तटकरेंच्या नावाची मते दुसऱ्या तटकऱ्यांना मिळाली होती, त्यामुळे त्याचा तटकरे यांना जबरी धक्का बसला होता हाच धोका याही निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्या मागे साधर्म्य नावाच्या व्यक्तींचा तिढा कायम आहे. 1991 सालच्या निवडणुकीत घडला होता. त्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार दत्ता पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या आणखी एका दत्ता पाटील नावाच्या व्यक्तीला काँग्रेसने उभे केले होते. त्याचा फटका शेकापच्या दत्ता पाटील यांना बसला होता. अशीच खेळी यावेळीदेखील खेळण्यात आली आहे. त्यामुळे अनंत गीते आणि सुनिल तटकरे यांना यावेळी काय फटका बसणार? नेमकं काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री