बोईसर, १२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शिउबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी पालघरच्या बोईसरमध्ये सभा झाली. पालघर लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडींच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी मोठ्यासंख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ही सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बोईसर ते वांद्रे लोकलने प्रवास केला.
बोईसरमधील सभा आटोपल्यानंतर उद्धव ठाकरे कारने बोईसर रेल्वे स्थानकावर पोहचले. उद्धव ठाकरे येताच कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी करत उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर हे देखील होते. उद्धव ठाकरे यांनी लोकलमध्ये विंडोसिटवर बसून प्रवास केला. त्यांच्या शेजारी संजय राऊत बसले होते. लोकलमध्ये देखील कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.