Monday, September 09, 2024 05:57:50 PM

लपूनछपून राशपात

लपूनछपून राशपात

पुणे, ११ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : माढा लोकसभा मतदारसंघातले नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली असून त्यांचा राशपत प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या १४ एप्रिल रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार असून १६ एप्रिलला ते माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते. त्यामुळे आता भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारीची कोंडी फुटली असून धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजपचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्याविरोधात दोन हात करतील. अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात १४ एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमात धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यांच्या पक्षप्रवेशाला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, बाळदादा मोहिते पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतीये. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत १६ एप्रिल रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या मोहिते पाटील कुटुंबीयांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह कायम ठेवला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीगाठी झाल्यानंतर आता धैर्यशील मोहिते पाटील हेच शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर माढा लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्य प्रवेश करतील. गेल्या तीन आठवड्यांपासून मोहिते पाटील-पवार यांच्यात गाठीभेटी होत होत्या. भाजपवर दबावतंत्राचा वापर करून उमेदवार बदलण्याची मागणी मोहिते पाटील करत होते पण भाजपने तशी कोणतीही पावले उचलली नसल्याने अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे.

धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत बंधू रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोहिते पाटील घराण्यातील बंडखोरी टाळण्यासाठी शर्थी प्रयत्न केले. मात्र तरीही धैर्यशील पाटील यांनी बंडखोरी करायच ठरवलं असून ते माढ्यातून अर्ज भरणार आहेत. रणजित निंबाळकर यांच्या उमेदवारीला महायुतीत असलेल्या रामराजे निंबाळकरांनीही विरोध केला आहे. त्या दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर कुटुंबीयांच्या भेटीगाठी होत आहेत. या परिस्थितीत महायुतीत असलेले फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे बंधू काय भूमिका घेता हे देखील महत्वाच ठरणार आहे.

माढा - रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, भाजपा विरुद्ध रमेश नागनाथ बारसकर, वंचित (मतदान ७ मे २०२४)


सम्बन्धित सामग्री