Sunday, July 07, 2024 01:52:31 AM

घड्याळ दाबायचे कसे ?

घड्याळ दाबायचे कसे

धाराशिव, ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : राज्यात महायुतीतील तीनही पक्ष लोकसभेची निवडणूक एकत्रित लढणार, असे या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी स्पष्ट केले होते. तसेच अनेक मतदासंघामध्ये अदलाबदल केले जाऊ शकतात, असे संकेतही देण्यात आले होते. प्रत्यक्षात जेव्हा मतदारसंघात अदलाबदल करण्यात आली तेव्हा मात्र घटक पक्षांकडून नाराजीचा सूर उमटतांना दिसतो आहे. मराठवाड्यातील हिंगोली, धाराशिव, परभणी या मतदारसंघात याचे पडसाद उमटताना दिसले.

धाराशिव लोकसभेची जागा शिवसेनेची असताना आणि अनेकजण निवडणूक लढवण्यास इच्छूक असताना ती राष्ट्रवादीला सोडण्यात आली. या निर्णयाच्या विरोधात शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, धाराशिवची जागा शिवसेनेकडे घ्या आणि राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी रद्द करा, अशी मागणी वाशी तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. धाराशिवची जागा राष्ट्रवादीला सोडल्याच्या रागातून तालुक्यातील दोन हजार शिवसैनिकांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाच्या अर्जांची होळी करत संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीने अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रचाराला सुरवात केली असताना शिवसैनिकांनी मात्र त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत आक्रमक भूमिका घेतली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत इच्छुक होते. परभणीची जागा राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून रासपच्या जानकरांना सोडल्यामुळे त्यांना धाराशिवची जागा देण्यात आल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादीने तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा तातडीने पक्ष प्रवेश करून घेत त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली, वाशी तालुक्यात याचे तीव्र पडसाद उमटल्याचे पहायला मिळाले.

महायुतीमध्ये धाराशिव हा मतदारसंघ अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीला सुटला असून या ठिकाणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानंतर आता धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये लढत कशी होणार पाहुयात….

उस्मानाबाद (धाराशिव) - अर्चना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध ओमराजे निंबाळकर, शिउबाठा (मतदान ७ मे २०२४)

कोण आहेत अर्चना पाटील ?

धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा आहेत.
तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत.
२०१२ समाजकार्यातून राजकारणात पदार्पण.
धाराशिव जिल्ह्यातील केशेगाव जिल्हा परिषद गटातून विक्रमी मतांनी विजयी.
२०१७ धाराशिव जिल्ह्यातील तेर जिल्हा परिषद गटातून विजयी.
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली.
अंगणवाडी सेविका यांचे मानधन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले.

धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मिळावी यासाठी दबाव तंत्र वापरले आहे त्यामुळे या दबावदंत्राकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यापुढे महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही बिघाडी सुधारणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार, त्यामुळे या दबावदंत्राकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाले. शिवसैनिक मुख्यमंत्र्यांकडे जागा शिवसेनेला सोडण्यात यावी अशी मागणी करत आहेत. शिंदे सरकारचे मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या नेतृत्वात तानाजी सावंत समर्थकांनी ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर निदर्शने केली. या आंदोलनावर शिवसेनेच्या नेतृत्वाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

पालकमंत्री सावंत आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यात यापूर्वी वादाचे प्रसंग घडले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपात सावंत यांनी त्यांच्या भूम-परंडा या विधानसभा मतदारसंघाला अधिकच झुकते माप दिले होते. आमदार पाटील यांनी त्याला आक्षेप घेतला होता. धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जागा ठरवण्यावरूनही या दोघांत वाद झाला होता. अखेर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ठरवलेलीच जागा निश्चित करण्यात आली. पालकमंत्री सावंत यांना माघार घ्यावी लागली होती. 2019 मध्ये राणाजगजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अर्थात, भाजपची जिल्ह्याची सूत्रेही त्यांच्याच हाती आली. निष्ठावंतांनी थोडी हालचाल करून पाहिली, मात्र राणाजगजितसिंह यांच्यामुळे जिल्ह्यात पक्षाला बळ मिळाले आहे, हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे भाजपमध्येही राणाजगजतिसिंह यांचाच शब्द अंतिम असल्याचे दिसत आहे. मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटूनही उमेदवारी अर्चना पाटील यांना मिळाल्यामुळे राणाजगजितसिंह यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. यातूनच आता या कुरघोड्या सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

तानाजी सावंतांच्या पुतण्याची मुख्यमंत्र्यांच्याच घराबाहेर निदर्शने
शिवसेनेतील धाराशिवचा वाद विकोपाला
धाराशिव चे पालकमंत्री तानाजी सावंत यांना धाराशिव लोकसभेतुन उमेदवारी मिळावी या मागणीसाठी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवास्थानाबाहेर शक्तीप्रदर्शन
तानाजी सावंत समर्थक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर दाखल
धाराशिव लोकसभेमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतुन अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्याने तानाजी सावंत आणि कार्यकर्ते नाराज
धाराशिव ची जागा शिवसेनेची पारंपरिक जागा असल्याने ती शिवसेनेला मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही


सम्बन्धित सामग्री