Thursday, July 04, 2024 09:38:44 AM

गुंता सुटेना, चिंता मिटेना

गुंता सुटेना चिंता मिटेना

मुंबई, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटल्याचं दिसत नाही. दररोज दावे प्रतिदावे होतात पण घोषणा अद्याप झाली नाही. एकीकडे भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली त्यात भाजपकडून २० लोकसभा जागेसाठी उमेदवारांची घोषणा झाली आहे. पण मविआच्या जागावाटपाचं घोडं नेमकं अडलंय कुठे ? पाहुयात

मविआला भाजपाविरोधात उमेदवार मिळेना

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटल्याचं दिसत नाही. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी ताणलेल्या भूमिकेमुळे जागावाटपावर अंतिम निर्णय होत नसल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. प्रकाश आंबेडकर जर सोबत आले तर त्यांना किती जागा द्यायच्या हे ठरल्या आहेत. तर ते सोबत आले नाहीत तर त्यांच्याविना महाविकास आघाडीचे जागावाटप ठरल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे मंगळवार संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुमचा काय तो निर्णय द्या, अन्यथा आम्ही आमचं वेगळं लढू असा अल्टिमेटम आता महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र मविआने दिलेला निरोप मिळालाच नसल्याचं वंचितचं म्हणणं आहे.

वंचित ठरतेय मविआची डोकेदुखी ?

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये कळीचा मुद्दा झालेल्या वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होणार की नाही? याची चर्चा लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला, तरी सुरूच आहे. मात्र, आता लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडी विरोधात असलेला बचावात्मक पवित्रा बदलून टाकत थेट आक्रमक भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्रात मविआचं जागावाटप अडलेलं

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे जागावाटपाच्या फॉर्म्युलाचे दोन पर्याय तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ऐनवेळी महाविकास आघाडीत आली नाही, तर महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला २२-१६-१० असा राहिल. त्यानुसार शिउबाठा २२, काँग्रेस १६ आणि राशप दहा जागांवर लढण्याची शक्यता आहे.

वंचित महाविकास आघाडीत दाखल झाल्यास, २०-१५-९- ४ हा जागावाटपाचा फॉर्म्युला राहील. त्या परिस्थिती शिउबाठाला २०, काँग्रेसला १५, राशपला नऊ आणि वंचितला चार जागा देण्यात येतील. वंचितला शिउबाठाच्या कोट्यातून दोन, काँग्रेसच्या कोट्यातून एक आणि राशपच्या कोट्यातून एक जागा देण्याची तयारी आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे आता मविआचं लक्ष आहे.

महत्त्वाच्या जागांवर मविआचा उमेदवार कोण ?

महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा सुरु असताना शिउबाठाने २२ जागांवरील आपले उमेदवार निश्चित केले आहेत. दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत, तर उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर यांना अनौपचारिकपणे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर मुंबईची जागा आता काँग्रेसने सोडली, तर ठाकरे गटातील दिग्गज नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. नुकतीच हत्या झालेले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचे ते पिता आहेत.

पंकजा मुंडेंविरोधात ज्योती मेटे

भाजपकडून पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यावर महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती. अशात विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या देखील नावाची चर्चा होती. मात्र, महाविकास आघाडीत शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे मागील लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांना दुसऱ्या क्रमांकाचे मते मिळाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा सोनवणे यांच्याच नावाचा विचार करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. तर, उद्या बजरंग सोनवणे शरद पवारांच्या उपस्थितीत पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारी घोषित करण्यात आली नाही. मात्र आता पंकजा मुंडे यांच्यासमोर सक्षम उमेदवार देण्यासाठी शरद पवार हे मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे राशपत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून त्या उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या अजित पवारांसोबत असलेल्या बजरंग सोनवणे यांनी देखील काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. मात्र बजरंग सोनवणे यांच्या ऐवजी शरद पवारांकडून ज्योती मेटेंना झुकते माप मिळण्याची शक्यता आहे.

चंद्रपूरमधून कोण उभे राहणार ?

महाविकास आघाडीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा असतानाच दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या एका ट्विटने चंद्रपूरच्या जागेवरून ट्विस्ट वाढला आहे. चंद्रपूरमधून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार इच्छुक असून, दुसरीकडे प्रतिभा धानोरकर यांनी देखील तयारी केली आहे. अशात, “उमेदवारी आपली, विजयही आपलाच” असा दावा करणारं ट्वीट प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे. त्यामुळे शिवानी वडेट्टीवारांचा पत्ता कट झाला का? अशी चर्चा आहे.

गडकरी विरुद्ध ठाकरे

नागपूर लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या नावावर मंगळवारी एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या घरी झालेल्या बैठकीत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी आ. ठाकरे यांचे उमेदवार म्हणून नाव सूचविले तर नितीन राऊत यांनी अनुमोदन दिले. बैठकीत एकताने झालेला निर्णय प्रदेश काँग्रेस व अ.भा. काँग्रेस समितीला कळविण्यात आला. त्यामुळे काँग्रेसकडून आ. ठाकरे यांची अधिकृत घोषणा झाली तर नागपुरात भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध आ. विकास ठाकरे अशी लढत होण्याची शक्यता आहे.

                 

सम्बन्धित सामग्री