Thursday, July 04, 2024 11:30:44 AM

आठवलेंचा आग्रह, शिवसेनेला डोकेदुखी

आठवलेंचा आग्रह शिवसेनेला डोकेदुखी

शिर्डी, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. सातत्यानं या मतदारसंघाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असते. सध्या या लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे सदाशिव लोखंडे आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते शिवसेनेकडून निवडून आले होते. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर लोखंडेंनी शिंदेंना साथ दिली. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस नेते भाऊसाहेब कांबळे यांच्यासह अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला होता. दरम्यान, यावेळी म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अनेकजण शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहे. मंत्री रामदास आठवलेंसह, भाऊसाहेब कांबळे, भाऊसाहेब वाकचौरे इच्छुक आहेत.

शिर्डी लोकसभेसाठी आठवले आग्रही

शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी रिपाई आठवले गटाकडून भाजपवर दबाव वाढवला जात आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना शिर्डीत उमेदवारी न दिल्यास शिर्डी, सोलापूर आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ रिपाई आठवले गटाकडून अपक्ष उमेदवार दिले जातील, असा इशारा देण्यात आला आहे. आठवले गटाचा या वाढत्या दबावामुळे भाजप आणि शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. भाजपने महाराष्ट्रात २० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा देखील समावेश आहे. विद्यमान खासदार सुजय विखे यांना येथे उमेदवारी जाहीर झाली आहे. नगर जिल्ह्यात शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे, असे असताना महायुतीतील प्रमुख भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केले. यात नगर दक्षिणचा उमेदवाराचा समावेश आहे. परंतु शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचा खासदार असताना देखील उमेदवार जाहीर केलेला नाही.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास

मतदारसंघात अनेक वर्ष काँग्रेसचं वर्चस्व
२००९मध्ये मतदारसंघ फेररचनेत मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव
यावेळी भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेनेकडून तिकीट देण्यात आले.
त्यांनी आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांचा पराभव केला.
२०१४ ला सेनेचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे काँग्रेसमध्ये गेले.
शिवसेनेकडून माजी आमदार सदाशिव लोखंडे रिंगणात उतरले.
मोदी लाटेत सदाशिव लोखंडे विजयी झाले.
२०१९ ला पुन्हा सदाशिव लोखंडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी
लोखंडे यांनी दुसऱ्यांदा विजयी होण्याचा बहुमान मिळवला.

शिर्डी लोकसभेसाठी महायुतीत रस्सीखेच

गेल्या दहा वर्षापासून शिर्डी लोकसभेचे खासदार असलेल्या सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात स्वपक्षीयांनीच रणशिंग फुंकले आहे.. मतदारसंघात कोणतेही ठोक कामे केली नाही, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही त्यामुळे आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचं असा सवाल करत अनेक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहे.. यांना परत लोखंडेंना उमेदवारी देऊ नका अशी भूमिका आता शिवसैनिकांनी घेतली आहे…

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात आजवर झालेल्या निवडणुकीत कधीही विकासाच्या मुद्यावर चुरस रंगली नाही.. केवळ जातीय समीकरण आणी पक्षबदलामुळे निर्माण झालेली नाराजी यातून लोखंडे दोनदा शिर्डीतून खासदार झाले मात्र दोन वेळा संधी देऊनही शिर्डीचा कोणताही विकास त्यांनी केला नसल्याच भाजपचं म्हणणं असून हि जागा भाजपला दिली तर विजय निश्चित असल्याचं भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचं म्हणण आहे…

शिर्डी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा येतात या सर्व विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद जास्त आहे. त्या तुलनेने शिवसेनेची ताकद कमी असून.. त्यामुळे हि जागा भाजपला मिळावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. आणि तीच आपलीही भावना असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलंय..

शिर्डी लोकसभेची जागा २००९ मध्ये लढवणारे रामदास आठवले हे देखील पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.. भाजपला विजयासाठी दलित मतांची गरज असून मला शिर्डीची जागा दिली जावी आणी माझी राज्यसभा विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना द्यावी असा प्रस्ताव ठेवला आहे…

गेल्या तीन निवडणूकीत शिवसेनेचा खासदार निवडून देणा-या शिर्डी मतदारसंघात यावेळी मात्र विद्यमान खासदारावर मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे.. त्यामुळे या जागा वाटपात शिर्डीची जागा महायुतीत कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..


सम्बन्धित सामग्री