Sunday, June 30, 2024 09:39:13 AM

मविआला उमेदवार मिळेना

मविआला उमेदवार मिळेना

मुंबई, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उमेदवारीची अखेर भारतीय जनता पक्षाने केली असून आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या नावाची प्रतीक्षा आहे.सलग दोन वेळा प्रचंड मतदाधिक्याने गडकरी नागपूरमधून विजयी झाल्याने भाजपच्या हमखास विजयी होणाऱ्या जागेत नागपूरचा समावेश होता. २०१४ मध्ये पहिल्यांदा गडकरी यांनी प्रथमच नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती व २ लाख ८४ हजार मतांनी काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांचा पराभव केला होता. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे नाना पटोले यांचा २ लाख १६ हजार मतांनी पराभव केला होता. आता २०२४ च्या निवडणुकीत भाजपने पुन्हा त्यांना संधी दिली आहे. आता त्यांच्या विरोधात मविआचा उमेदवार कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मविआमध्ये नागपूरची जागा काँग्रेसकडे आहे. या पक्षाकडून विद्यमान आमदार विकास ठाकरे व अभिजित वंजारी या दोन नावांची चर्चा आहे, ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक नसल्याचे पक्षाला कळविले आहे. त्यामुळे पक्ष वंजारी यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालते की नवा चेहरा निवडणुकीत उतरवते हे बघावे लागणार आहे.

सध्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात बाहेरच्या लोकसभा मतदार संघातील नेते उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. मात्र बाहेरचा उमेदवार लादू नये, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातीलच उमेदवार द्यावा अशी आग्रही मागणी केली. त्यामुळे चंद्रपूर लोकसभेत स्थानिक उमेदवारच दिला जाईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. संभाव्य घडामोडी बघता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुलगी शिवानी वडेट्टीवार हिला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून शिवानी वडेट्टीवार यांनी समर्थकांसह दिल्ली गाठली आहे. तिथे काँग्रेस नेते मुकूल वासनिक, काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खारगे यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती आहे. वडेट्टीवार एकीकडे दिल्लीतून प्रयत्न करित असतांना चंद्रपूर लोकसभेच्या बैठकीचे निमंत्रण त्यांना देण्यात आले नाही अशीही माहिती आहे.

आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून बुधवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून भाजपने रक्षा खडसे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर केली. रक्षा खडसे यांना उमेदवारी घोषित होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांच्या समोर सासरे एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्याची तयारी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु एकनाथ खडसे यांनी तब्येत ठीक नसल्याचे म्हटले. डॉक्टरांनी परवानगी दिली तर निवडणूक लढवणार असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांची कन्या आणि रक्षा खडसे यांच्या भावजय रोहिणी खडसे यांना उमदेवारी देण्यात यावी, अशी मागणी बैठकीत झाली होती. त्यामुळे आता शरद पवार गटाकडून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या काही संभाव्य उमेदवारांची चर्चा आहे कोण आहेत संभाव्य उमेदवार पाहुयात…

कुलभूषण पाटील नेता शिउबाठा

ललिता पाटील नेत्या शिउबाठा

डॉ. हर्षल माने नेता शिउबाठा

मविआचे संभाव्य उमेदवार

रवींद्र पाटील जिल्हाध्यक्ष, राशप

एकनाथ खडसे गट नेते, राशप

पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. याआधी बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार असलेल्या प्रितम मुंडेंना डावलून पंकजा यांना ही उमेदवारी देण्यात आली असल्यामुळे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. पंकजा मुंडे यांनी याबाबत बोलताना म्हटलं, “मला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. याचा मला आनंद आहे. माझं आणि प्रितमचं कॉम्बिनेशन चांगलं होतं. पण प्रितम यांचं तिकीट कापून मला दिलं त्यामुळे मनात संमिश्र भावना आहेत. आता मी लोकसभेची तयारी करणार आहे.” बीड लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा गड मानला जात असला तरी यावेळेला राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे माविआचा बीड लोकसभेसाठी उमेदवार कोण असेल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.


सम्बन्धित सामग्री