Saturday, October 05, 2024 03:23:18 PM

नायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री

नायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री

हरियाणा, १२ मार्च २०२४, प्रतिनिधी : नायब सिंग सैनी यांनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्‍यांना राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. मनोहरलाल खट्टर यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांनंतर भाजपाने नायब सिंग सैनी यांची विधिमंडळ पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून घोषणा केली.
कुरुक्षेत्रचे लोकसभा खासदार नायबसिंग सैनी हे ओबीसी समाजाचे आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांची हरियाणा भाजपाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. सैनी हे मनोहरलाल खट्टर यांच्या जवळचे मानले जातात.

नायब सिंग सैनींची राजकीय कारकीर्द

माजी मुख्‍यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे निकटवर्ती अशी ओळख असणार्‍या नायब सैनी यांचा जन्म २५ जानेवारी १९७० रोजी अंबाला येथील मिर्झापूर माजरा गावात झाला. बीए. एलएलबी असे त्‍यांचे शिक्षण झाले आहे. सैनी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. सैनी यांची राजकीय कारकीर्द तीन दशकांपूर्वी सुरू झाली. ते २००२ मध्ये अंबाला येथील भाजप युवा शाखेचे जिल्हा सरचिटणीस झाले आणि २००५ मध्ये त्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

त्यांनी पक्षाच्या अनेक शाखांमध्ये काम केले आहे ज्यात शेतकरी मोर्चा किसान मोर्चाचा समावेश आहे. ते किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस होते. २०१२ मध्ये त्यांची अंबाला येथे जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी निवड झाली.

संघटना स्तरावर अनेक पोस्टिंगनंतर, २०१४ च्या राज्य निवडणुकीत ते नारायणगडमधून आमदार म्हणून निवडून आले. २०१६ मध्ये त्यांची राज्यमंत्रीपदी निवड झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सैनी यांना कुरुक्षेत्र मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी काँग्रेसच्या निर्मल सिंह यांचा सुमारे चार लाख मतांनी पराभव केला.


सम्बन्धित सामग्री