Wednesday, October 02, 2024 12:55:04 PM

काँग्रेस दिशाहीन, नेतृत्वहीन

काँग्रेस दिशाहीन नेतृत्वहीन

मुंबई, ११ मार्च २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस दिशाहीन आणि नेतृत्वहीन झाली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसकडे नेतृत्व नाही. राहुल गांधींची पदयात्रा प्रभावहीन आहे. मोदी विरोधकांची इंडी आघाडी टिकेल असे वाटत नाही; असे भाजपाचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण म्हणाले. ते जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांनी खासदार अशोक चव्हाण यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत अशोक चव्हाणांनी अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. त्यांच्या राजकीय निर्णयामागची कारणं सांगितली.

महाराष्ट्रात काँग्रेस पुरती दिशाहीन आणि नेतृत्वहीन झाली आहे. भविष्याच्या दृष्टीने राज्यातली काँग्रेस ठोस काम करताना दिसत नाही कारण त्यांच्याकडे सक्षम नेतृत्वच नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले. मोदींना विरोध करण्यासाठी इंडी आघाडीची स्थापना झाली. पण निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधीच या आघाडीची शकले पडल्याचे चित्र आहे. या परिस्थितीत इंडी आघाडीला अर्थच उरलेला नाही. ही आघाडी टिकणार नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले. राहुल गांधी पदयात्रा करत आहेत. पण ही पदयात्रा प्रभावहीन झाली आहे. ज्या भागांमधून ही पदयात्रा गेली तिथे काँग्रेसला राजकीयदृष्ट्या विशेष फायदा होत असल्याचे दिसत नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले. लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे आणि काँग्रेसकडे उमेदवारांची मारामार आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहनत करत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ते आश्वासक वाटतात. नागरिक त्यांच्याकडे आशेने, विश्वासाने बघतात. हेच त्यांच्या नेतृत्वाचे सगळ्यात मोठे यश असल्याचे मत अशोक चव्हाणांनी व्यक्त केले. मोदींना वाईट बोललेले लोकांना आवडत नाही, अशी पुस्ती अशोक चव्हाणांनी जोडली.

राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व स्वीकारले तर काय चुकले, असेही अशोक चव्हाण यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. उद्धव राजकीय विरोध करताना ज्या भाषेचा वापर करत आहेत त्याबाबत अशोक चव्हाणांनी त्यांचे आक्षेप जाहीर केले. उद्धव यांनी बोलताना भाषा सांभाळावी, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अशोक चव्हाण बोलले. त्यांनी मराठे मागास असल्याचे सांगितले. मागास मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, असेही अशोक चव्हाण म्हणाले. आदर्श सोसायटी प्रकरणात आरोप भाजपाकडून नव्हे काँग्रेसमधूनच, असे अशोक चव्हाणांनी सांगितले.

अशोक चव्हाणांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे

१. दिशाहीन महाराष्ट्र काँग्रेसला नेता नाही
२. इंडी आघाडी टिकणार नाही
३. मोदी मेहनत करतात, आश्वासक वाटतात
४. राहुल गांधींची पदयात्रा प्रभावहीन
५. फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारलं तर, चुकलं काय?
६. मराठे मागास आहेत. आरक्षण हवंच
७. उद्धवनी बोलताना भाषा सांभाळावी
८. मोदींना वाईट बोललेले लोकांना आवडत नाही
९. काँग्रेसला उमेदवार मिळायची मारामार आहे
१०. आदर्श प्रकरणी आरोप भाजपाकडून नव्हे काँग्रेसमधूनच
११. चिखलीकर आणि माझ्यात वाद नाही


सम्बन्धित सामग्री