Saturday, October 05, 2024 04:41:57 PM

रवींद्र वायकरांचा शिवसेनेत प्रवेश

रवींद्र वायकरांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई, १० मार्च २०२४, प्रतिनिधी : शिउबाठा गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी रविवारी रात्री ९ वाजता त्यांचा पक्षप्रवेश झाला. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी वायकर यांची मागच्या काही दिवसांपासून चौकशी सुरु होती. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.

पक्षप्रवेशानंतर बोलताना रवींद्र वायकर म्हणाले की,

मी मागच्या पन्नास वर्षांपासून शिवसेनेसोबत काम करत आलेलो आहे. तीनवेळा आमदार आणि अनेकदा नगरसेवक झालेलो आहे. आरेमधील ४५ किलोमीटरचे रस्ते होणं गरजेचं आहे. त्यासाठी १७३ कोटी रुपये पाहिजे आहेत. काही ठिकाणी पाण्याची सोय नाहीये. त्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. ते घेतले नाहीत तर लोक नाराज होतील. सत्तेमध्ये असल्यानंतरच हे कामं मार्गी लागतील. देशामध्ये आता मोदी साहेबांची सत्ता आहे. ते चांगलं काम करत आहेत. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे वेगवेगळे निर्णय घेत आहेत. माझे प्रश्न सुटले नाहीत तर मी लोकांसमोर जावू शकत नाही. त्यामुळे मी शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

https://youtu.be/3k2zlSGOUt8?si=MER8aVwXUmXhl15p

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,

बाळासाहेबांनी जो विचार दिला तो पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. वायकर यांनी जो निर्णय घेतला आहे तो कौतुकास्पद आहे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मला सांगितलेले आहेत. ते सोडवण्याचा सरकार म्हणून मी प्रयत्न करणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगभरात भारताचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. वायकर यांनी त्यामुळे शिवसेनेसोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. वायकर यांचे काम केवळ मतदारसंघापुरतं नाहीये. संपूर्ण मुंबईसाठी वायकरांचं मोठं काम आहे. त्यांनी जो निर्णय घेतला आहे, त्याचं मी स्वागत करतो.


सम्बन्धित सामग्री