Thursday, July 04, 2024 10:21:15 AM

त्रिपुरात विरोधी पक्ष भाजपाशी युती करणार

त्रिपुरात विरोधी पक्ष भाजपाशी युती करणार

आगरतळा, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : त्रिपुरात मुख्य विरोधी पक्ष असलेल्या टीएमपीने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. टीएमपी अर्थात टिपरा मोथा पार्टी भाजपासोबत युती करणार आहे. टिपरा मोथाचे १३ आमदार सत्तेत सहभागी होणार आहेत. सरकारला पाठिंबा देणाऱ्या टिएमपीच्या १३ पैकी एक किंवा दोन आमदारांना लवकरच मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

त्रिपुरामध्ये ६० सदस्यांच्या विधानसभेत सत्ताधाऱ्यांचे ३३ आमदार आहेत. टीएमपीच्या १३ आमदारांमुळे सत्ताधाऱ्यांच्या आमदारांची संख्या ४६ होणार आहे. सरकारची विधानसभेतील ताकद आणखी वाढणार आहे. टीएमपी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच भाजपाच्या नेतृत्वातील रालोआमध्ये सहभागी झाली आहे. बिजू जनता दलाने ओडिशात भाजपासोबत युतीची तयारी सुरू केली आहे. यामुळे ईशान्य भारतातील भाजपाची राजकीय स्थिती आणखी बळकट झाल्याचे चित्र आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकार, त्रिपुरा सरकार आणि टिपरा मोथांचा पक्ष यांच्यात भूमिपुत्रांच्या प्रश्नांबाबत लेखी करार झाला होता. हा करार झाल्यापासून टीएमपी सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर ही शक्यता प्रत्यक्षात आली आहे.

त्रिपुरा विधानसभा : एकूण आमदार संख्या ६०

त्रिपुरा सरकार

भाजपा : ३२ आमदार
आयपीटी : १ आमदार
टीएमपी : १३ आमदार
सत्ताधारी आमदार : ४६

त्रिपुरातील विरोधक

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी : ११ आमदार
काँग्रेस : ३ आमदार
एकूण विरोधक : १४ आमदार

        

सम्बन्धित सामग्री