Monday, July 01, 2024 03:05:27 AM

पक्ष आणि चिन्ह गेल्यावर काय म्हणाले पवार ?

पक्ष आणि चिन्ह गेल्यावर काय म्हणाले पवार

बारामती, १७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पक्ष आणि चिन्ह ताब्यातून गेल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीत आलेल्या शरद पवारांनी गोविंदबाग या निवासस्थानी माढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या ऐवजी शरद पवार यांना साथ देण्याचे वचन दिले. शरद पवारांनी राशपसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्यांचे स्वागत केले. माढा मतदार संघातील मैत्री फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षासह त्यांच्या कार्यकर्त्यांनीही राशपसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्ष आणि चिन्ह गेल्याच्या मुद्यावर शरद पवार बोलले.

राजकारणामध्ये पक्ष उभे राहतात काहीजण पक्ष सोडून जातात ही प्रक्रिया चालू राहते. मात्र ज्याने पक्ष स्थापन केला त्याच्याकडून काढून घेत पक्षच दुसऱ्याला दिल्याची घटना देशात कधी घडली नसल्याचे पवार म्हणाले. निर्णय कायद्याला धरून आहे असे वाटत नाही. या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागत असल्याचे पवार म्हणाले. निकाल लवकरच लागेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

राजकीय कारकिर्दीत १४ निवडणुका लढवल्या. या चौदापैकी पाच निवडणुकांमध्ये वेगळे चिन्ह होते, असे पवारांनी सांगितले. बैलजोडी, गायवासरू, चरखा, हात, घड्याळ या चिन्हांवर आतापर्यंत निवडुका लढवल्याचे पवार म्हणाले. चिन्ह काढून घेतले तरी संघटनेचे अस्तित्व संपत नाही. पण सामान्यांशी संपर्क वाढवून चिन्ह त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. असे पवारांनी सांगितले. माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार लवकरच जाहीर करणार असे सांगून पवारांनी कार्यकर्त्यांना एकदिलाने, एकजुटीने काम सुरू करण्याचे निर्देश दिले.


सम्बन्धित सामग्री