Sunday, July 07, 2024 09:35:25 PM

शिउबाठाला मराठवाड्यात धक्का

शिउबाठाला मराठवाड्यात धक्का

अकोला, १६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाला मराठवाड्यात धक्का बसला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठीचे शिउबाठाचे संघटक डॉ. बी. डी. चव्हाण यांनी राजीनामा दिला आणि वंचितमध्ये प्रवेश केला. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या यशवंत भवन या निवासस्थानी डॉ. बी. डी. चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला.

डॉ. बी. डी. चव्हाण हे महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. यानिमित्ताने आंबेडकरांनी मराठवाड्यातील बंजारा समाजाची मते आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अकोला जिल्ह्यातील शिउबाठाच्या मुर्तिजापूर येथील तालुकाप्रमुख संगीत कांबे यांनीही वंचितमध्ये प्रवेश केला. संगीत कांबे यांच्या पत्नी गायत्री कांबे पंधरा वर्षांपासून शिउबाठाच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत.

मविआत मतभेद असल्याची चर्चा

वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मविआतील इतर घटक पक्षांना किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यासाठी त्यांची मते कळवली आहेत. पण अद्याप महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम तयार झालेला नाही. या विषयावर चर्चा झाली की नाही हे पण माहिती नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. आवश्यकता भासली तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व अर्थात ४८ जागा लढवण्याची तयारी वंचितने केली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.


सम्बन्धित सामग्री