Sunday, June 30, 2024 09:55:28 AM

काँग्रेसचं शिष्ठमंडळ राज्यपालांच्या भेटीला

काँग्रेसचं शिष्ठमंडळ राज्यपालांच्या भेटीला

मुंबई, १० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार, मुंबईत माजी नगरसेवकाची झालेली हत्या आणि पुण्यात सामाजिक कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शनिवारी शिउबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार बरखास्त करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी आणि लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केली. त्यानंतर आता काँग्रेस आणि राशप पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत याच मागणीचं निवेदन दिलं आहे.

राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीविषयी माहिती देताना राशप पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, राज्यात ढासळलेली कायदे व्यवस्था आणि यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारला बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी करत त्यासंदर्भातील एक निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना शनिवारी देण्यात आले."

दरम्यान, राज्यपालांच्या भेटीसाठी गेलेल्या विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळामध्ये आव्हाड यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, नसीम खान तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.


सम्बन्धित सामग्री