मुंबई, २ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी उद्धव यांची भेट घेतली. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली. चर्चेनंतर राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. याप्रसंगी बोलताना राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले. आधी ठरवल्याप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढणार आहे, असे ते म्हणाले. उद्धव यांच्याशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली, असेही राजू शेट्टी म्हणाले. सोयाबीनला जास्तीचा भाव मिळावा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी मराठवाड्याचा दौरा करणार आहे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. अदानी विरोधात उद्धव यांनी संघर्षाची भूमिका घेतली आहे. या भूमिकेला राजू शेट्टी यांनी पाठिंबा जाहीर केला. शेतकरी आणि कारखानदार यांच्यातून पर्याय निवडताना महाविकास आघाडी प्रत्येकवेळी कारखानदारांची बाजू घेते. याच कारणामुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही, असे राजू शेट्टी म्हणाले.