पाटणा, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीआधी बिहारमध्ये नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. जनता दल संयुक्त अर्थात जेडीयूचे अध्यक्ष आणि पक्षाचे लोकसभेतील नेते ललन सिंह यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. हा राजीनामा पक्षाने स्वीकारला. ललन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच जनता दल संयुक्तचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. ही प्रक्रिया पार पडली त्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 'नितीश कुमार झिंदाबाद', 'नितीश कुमार देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे' अशा घोषणा दिल्या.