Sunday, October 06, 2024 02:33:30 AM

उद्धव गटाचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक

उद्धव गटाचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : उद्धवगटाचे उपनेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वक्तव्य करणं खूपच महागात पडले आहे. शिंदेंच्या विरोधात अपशब्द वापरल्याने दत्ता दळवी यांना बुधवारी (२९ नोव्हेंबर) अटक करण्यात आली आहे. भांडुप पोलिसांनी दत्ता दळवी यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दळवी यांना दुपारनंतर बुधवारी (२९ नोव्हेंबर) न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव गटाला मोठा धक्का बसला असून एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं ?

रविवारी (२६ नोव्हेंबर) भांडूपमध्ये ठाकरे गटाने कोकणवासियांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपशब्द वापरले होते. राजस्थानमधील प्रचारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे ‘हिंदुह्रदयसम्राट’ अशी उपमा लावण्यात आली होती. त्यामुळे दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केली होती. दळवी यांचीही अशुद्ध आणि अश्लील भाषा शिंदे गटाला चांगलीच झोंबली होती. त्यामुळे शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडूप पोलिस ठाण्यात दळवी यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. सार्वजनिक सभेत संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ आणि अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार दिली होती.

महत्वाचे मुद्दे -

ठाकरे गटाला मोठा झटका
माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक
‘ते’ विधान भोवलं


सम्बन्धित सामग्री