Friday, July 05, 2024 06:07:45 AM

प्रचार फलकावर शिंदेंचा हिंदुहृदयसम्राट उल्लेख

प्रचार फलकावर शिंदेंचा हिंदुहृदयसम्राट उल्लेख

राजस्थान, २४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले होते. ज्या उमेदवाराच्या प्रचाराला ते गेले होते त्याच्या फलकावर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख 'हिंदूहृदय सम्राट' असा करण्यात आला होता. या फलकाचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर आता त्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण चिघळल आहे. उद्धव गट यावरुन आक्रमक झाला आहे. यावरून उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.

नेमक प्रकरण काय?

राजस्थानात विधानसभा निवडणुकीचा प्रचार गुरुवारी संपला. या शेवटच्या दिवशी हवामहल मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बालमुकुंदाचार्य यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला मोठी गर्दी देखील जमवण्यात आली होती. या रॅलीची माहिती देणाऱ्या आणि स्वागतासाठीच्या एका फलकावर भाजपच्या नेत्यांसह एकनाथ शिंदे यांचाही मोठा फोटो लावण्यात आला होता. परंतु फलकावर शिंदेंचा उल्लेख हिंदू हृदयसम्राट असा करण्यात आला होता.

उद्धव गटाचे खासदार संजय राऊतांचा घणाघात
या प्रकारावर उद्धव गटाचे खासदार संजय राऊतांनी यावर भाष्य केलं असून त्यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीकास्त्र केली आहे. राऊत म्हणाले, आम्ही इतके वर्षे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं काम केलं. त्यांचा संघर्ष पाहिला हिंदुत्वासाठी त्यांनी सत्तेसाठी कधी बेईमानी केली नाही.

आता सत्तेसाठी बेईमानी करणाऱ्यांना हिंदुहृदय सम्राट म्हणण्याची नवी परंपरा नव्या हिंदुत्वात सुरु झाली असेल तर पहावं लागेल. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अन् स्वातंत्र्यवीर सावरकर हे दोनच असंही राऊत यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे हे हिंदूहृदय सम्राट असतील तर त्यांनी हिंदुहृदय सम्राट म्हणून काय असं महान कार्य केलं आहे. हे आम्हाला सगळ्यांना पाहावं लागेल, अशा शब्दांत राऊतांनी शिंदेंवर घणाघात केला आहे.


सम्बन्धित सामग्री